वर्धा – देशात आज राज्यघटनेच्या विचाराची अवहेलना होत आहे. राज्यघटना मोडीत काढण्याचे काम सुरु झाले आहे. विविध संस्थांचा वापर राजकारणासाठी होत आहे. वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे, त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत पण त्यांच्याकडे पाहण्यास पंतप्रधानांना वेळ नाही अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, काँग्रेसने मिळवलेले सर्व संपवण्याचे काम सुरु आहे,असे असताना आपण अस्वस्थ होणार नसाल तर पुढचा काळ तुम्हाला अस्वस्थ करणारा असेल. धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. हे चित्र बदलावे लागणार आहे, त्यासाठी पुन्हा जोमाने उभे रहायचे आहे आणि पुन्हा एकदा देशात सोनियाचे दिवस आणायचे आहेत.
महात्मा गांधींचा विचार या भूमित रुजलेला आहे, एकीकडे गांधींचा विचार व दुसरीकडे विकासाचा विचार याची सांगड घालण्याचे काम प्रमोदबाबूंनी केले. प्रमोदजी हे समाजजीवनाशी एकरुप झालेले नेतृत्व होते. राज्याच्या राजकारणात ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला त्यात प्रमोदबाबूंचे नाव वरच्या क्रमांकावर असेल. सामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटत त्यांनी विदर्भातील प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत यासाठी ते नेहमी आग्रही राहिले. त्यांच्याकडे असलेल्या पदांचा वापर त्यांनी नेहमी विकास कामांसाठी केला असंही ते म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धन मंत्री व पालकमंत्री सुनिल केदार, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री रणजित कांबळे, माजी मंत्री अनिस अहमद,आ. अभिजित वंजारी, माजी आमदार अमर काळे, शेखर शेंडे, अशोक शिंदे, सुरेश देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- कंपनीने असमर्थता दर्शविल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली – टोपे
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’; सनरायझर्स हैदराबाद समोर टिकणार का पंजाब किंग्स?
- भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार, 56 विमानांच्या खरेदी करण्याकरिता स्पेनच्या कंपनीसोबत करार
- मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबद्दल मोठे अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
