Share

बाबा पार्सेकर, निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा-  राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली

. ५ लाख रूपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, फैय्याज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे,राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत. बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्या तिन्ही प्रकारांमध्ये बाबांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

जे.जे.कला महाविद्यालयातून ॲप्लाईड आर्टची पदवी घेणाऱ्या बाबांना पहिलेच गुरु भेटले ते प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे. त्यांच्याबरोबर राहून बाबा भारतीय विद्या भवनाच्या एकांकिकांना नेपथ्य करु लागले. विजया मेहता या दुसऱ्या गुरु तिथे त्यांना लाभल्या. ललित कला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या ‘सागर माझा प्राण’ या नाटकाचे वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. आजवर 485 नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले आहे. निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा असून पं. कृष्णराव चोणकर, प्रा.बी.आर. देवधर यांच्याकडून आवाज साधना शास्त्राचे विशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे.

सुरुवातीच्या काळात महिला कला संगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या. साहित्य संघ मंदिर, मुंबई या संस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर मास्टर दामले, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार, नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर यासारख्या नामवंत कलाकारांसमवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेक संस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. भारतात तसेच परदेशात आकाशवाणी व दूरदर्शनवर गायनाचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार येत्या 20 नोव्हेंबर 2017 रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल,सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक आणि लीलाधर कांबळी यांना प्रदान करण्यात आला आहे.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार यापूर्वी फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, किर्ती शिलेदार, रजनी जोशी आणि चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना प्रदान करण्यात आला आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!