पुणे- लॉकडाऊन काळात पुण्यातील विविध भागांमध्ये वावर असलेल्या कबुतर-पारव्यांची अन्न साखळी तुटल्याने त्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, अनलॉक प्रक्रियेमुळे आता शहरातील विविध भागांमध्ये कबुतर आणि पारव्यांचा वावर पुन्हा एकदा वाढत आहे. आधीच करोना महामारीची साथ सुरू असताना, श्वसनाच्या विविध विकारांसाठी कारणीभूत ठरणारे कबूतर आणि पारवे यामुळे आरोग्याचा धोका वाढण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शहरात गेल्या काही वर्षांपासून वाढणारा कचरा, नागरिकांकडून उघड्यावर टाकले जाणारे अन्न यामुळे अलीकडील काळात शहर परिसरात कबुतर आणि पारव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पक्ष्यांची विष्ठा आणि पिसे यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याचे विविध अभ्यासांमधून समोर आले आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्वसनाचे विकार ही एक गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये कबुतर-पारव्यांची वाढती संख्या ही नागरिकांमध्ये भिती निर्माण करत आहे.
पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकू नका
आपल्याकडे भूतदयेपोटी अनेक नागरिक पक्ष्यांना अन्नधान्य तसेच इतर खाद्यपदार्थ खायला देतात. अनेकवेळा तेलकट पदार्थही पक्ष्यांना खायला टाक्ले जाते. मात्र, यामुळे पक्ष्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोच. मात्र, मानवी आरोग्यासाठीही ही बाब हानीकारक असते. त्यामुळेच शहरातील कबुतर-पारवे या पक्ष्यांना खाण्यासाठी खाद्यपदार्थ टाकू नका, असे आवाहन पक्षी अभ्यासकांकडून केले जाते.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील कबुतर आणि पारव्यांची संख्या बरीच कमी झाल्याचे निरीक्षण आम्ही नोंदविले आहे. विशेष म्हणजे या काळात नागरिकांकडून मास्कचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या दोन्हींचा सकारात्मक परिणाम शहरातील श्वसनाचे विकास असलेल्या रुग्णांवर पहायला मिळाला. आमच्याकडे येणाऱ्या बहुतांश रुग्णांच्या औषधांचा डोस कमी करावा लागला, असे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कबुतर-पारव्यांची कमी प्रमाण ही नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वाची बाब आहे. मात्र, त्याचबरोबर नागरिकांनी विशेषत: श्वसनाचे विकार असलेल्या रूग्णांनी मास्कचा वापर आवर्जून करावा. – डॉ. नितीन अभ्यंकर, श्वसनाचे विकारतज्ज्ञ
महत्वाच्या बातम्या-
#Corona: कोरोनाची लागण झाल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू
सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी…
जगासाठी भारत होणार चीनला पर्याय, गडकरींनी सांगितली ‘आयडियाची कल्पना’
विद्यार्थ्यांना घरूनही अभ्यास करता यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘ई-कंटेन्ट पोर्टल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

