मुंबई : महाविकास आघाडी स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. ठाकरे सरकार सध्या स्थिरावले आहे. सर्वात जास्त आमदार निवडून आले असतानाही भाजपला मात्र, सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. दोन दशके युतीत असणाऱ्या शिवसेनेने युती तोडत मुख्यमंत्रीपद मिळवले. शिवसेनेचे हे यश भाजपला पचलेले नाही. त्यामुळे भाजप नेते वारंवार ‘सरकार पडणार’चा जप करताना पाहायला मिळत होते.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.
फडणवीसांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन कमळ’ होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. या चर्चांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जेव्हा महाविकास आघाडी सरकार आले तेव्हापासून तारखा सांगितल्या जातात. मात्र, तसे काही घडलेले नाही. जोवर या सरकारला तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे हे सरकार अस्थिर होणार नाही’. अस म्हणत या चर्चांमधील हवा अजित पवारांनी काढून घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या


