🕒 1 min read
निलंगा(प्रा.प्रदीप मुरमे) : मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी होत असून महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतिश चव्हाण व भाजपा महायूतीचे उमेदवार शिरीष बोराळकर या उभयतांमध्ये ही चुरशीची लढत होत आहे. २००८ मध्ये भाजपाचे आ.श्रीकांत जोशी यांचा धक्कादायक पराभव करुन भाजपाच्या ताब्यातील हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.सतिश चव्हाण यांनी खेचून आणला होता. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणूकीत आ.सतिश चव्हाण यांनी दुसऱ्यांदा विजयश्री मिळवली.त्यामुळे तब्बल १२ वर्षापासून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.
या निवडणूकीत विजय संपादन करुन विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी आ.सतिश चव्हाण यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.दरम्यान राज्यातील शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे आ.सतिश चव्हाण यांच्यासाठी या निवडणूकीत मोठी जमेची बाजू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीतील अनेक मंत्री,नेते व आमदार आ.सतिश चव्हाण यांच्या विजयासाठी प्रचारात उतरले आहेत.तर भाजपा महायूतीने ही निवडणूक यावेळी कमालीची प्रतिष्ठेची केली आहे.
२०१२ मध्ये गेलेला हा मतदारसंघ नव्याने ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे.आ.चव्हाण यांच्या विजयाचा हा वारु या निवडणूकीत रोखून त्यांची विजयाची हॅटट्रीक होणार नाही याची जोरदार राजकीय खेळी भाजपाकडून आखण्यात आल्याचे समजते.त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष या दुकलीने या निवडणूकीची धूरा मराठवाड्यातील भाजपाचे आक्रमक नेते तथा माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावरती सोपविली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,रावसाहेब दानवे,माजी मंत्री पंकजा मुंडे आदी भाजपाचे दिग्गज नेते शिरीष बोराळकर यांच्या प्रचारात उतरले आहेत.
मागील १२ वर्षात विद्यमान आ.सतिश चव्हाण यांचा या मतदारसंघात अजिबात संपर्क नसून पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून केला जात आहे तर आ.चव्हाण यांना पदवीधरांच्या प्रश्नांचा चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांनाच पुन्हा संधी द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहे.एकुणच निवडणूक आता शेवटच्या टप्यात आल्याने प्रचार कमालीचा शिगेला पोहचला आहे.
महाविकास आघाडी व भाजपा या दोन्ही पक्षाकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असा जोरदार दावा केला जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रारंभी आ.चव्हाण यांच्यासाठी सोपी वाटणारी हि निवडणूक मतदान जवळ येईल तशी आव्हानात्मक वाटत आहे.शिरीष बोराळकर यांच्या रुपाने तगडे आव्हान उभे ठाकल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील चव्हाण-बोराळकर यांच्यातील ही लढत मोठी रंगतदार होत आहे.या चुरशीच्या लढतीत अखेर बाजीगर कोण ठरणार ? याबाबत मराठवाड्यातील पदवीधरांमध्ये कमालीचे औत्सुक्य लागून राहिले आहे,हे मात्र निश्चित !
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीची कारवाई ही ऑपरेशन कमळची सुरुवात’
- पंतप्रधान मोदी पुण्यात येणार मात्र ‘छोटे भाई’ उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित !
- ‘अशोक चव्हाण आणि अजितदादांचे फ्यूज उडाले नाही तर आमचे सरकार 20 वर्ष टिकेल’
- ‘मागून हल्ला केला, पुढून आले असते तर माझ्या यशने ३ जण तरी मारले असते’
- ईडीचा धडाका सुरूच : विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची १० तास चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

