संगमनेर – सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, समाजसेवा, पत्रकार, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणार्या व्यक्तींसाठी दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यावर्षी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार जेष्ठ विचारवंत व संपादक संजय आवटे यांना, डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना तर आदर्श सहकार व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हा थोरात कारखान्याचे माजी चेअरमन माधवराव कानवडे यांना देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक आ. डॉ. सुधीर तांबे व बाजीराव पाटील खेमनर यांनी यशोधन संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्कारांचे वितरण बुधवार जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता मालपाणी लॉन्स येथे होत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री मा. ना. भूपेश बघेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
या पुरस्कारांची निवड उल्हास लाटकर, प्रा. बाबा खरात, प्राचार्य केशवराव जाधव, विजयआण्णा बोर्हाडे, उत्कर्षाताई रुपवते, डॉ. राजीव शिंदे यांनी केली आहे. संगमनेर तालुका व नगर जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. आण्णा साहेब शिंदे जयंती समितीच्या वतीने व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण पुजाऱ्यांच्या विवाहासाठी ‘या’ राज्यात ‘ब्राह्मण मॅरेज स्किम’
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे’
- राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा – उद्धव ठाकरे
- ठाण्यातील औद्योगिक भूखंड व्यवहार प्रकरणी फेरतपासणीचे नाना पटोले यांचे आदेश
- नोरा फतेहीला करायचे तैमूरशी लग्न, करीना म्हणाली…


