टीम महाराष्ट्र देशा : पुण्यानंतर आता मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास ६० जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या पावसाळी उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर शिवसेना खा. संजय राऊत यांनी मालाडमधील दुर्घटना हे पालिकेचं अपयश नसून हा अपघात असल्याचं म्हंटल आहे.
संजय राऊत म्हणाले की, मालाडमध्ये रात्री घडलेली दुर्घटना पालिकेचं अपयश नाही. अनधिकृत बांधकामांमुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. मालाडमध्ये झालेली जीवितहानी अपघातानं झाली. ते पालिकेचं अपयश नाही. असे अपघात देशात कुठेही घडू शकतात. यावेळी त्यांनी रशियाचादेखील संदर्भ दिला. रशिया तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहे. तरीही सध्या तिथे पूर आला आहे. तसेच मुंबई महापालिकेनं संपूर्ण तयारी केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शहरात फिरुन नालेसफाईच्या कामाचा आढावा देखील घेतला होता, असे देखील संजय राऊत म्हणाले.
मुंबईत गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाउस पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांची दाणादाण झाली आहे. सर्वत्र पाणी साचले असून वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन नेमक करतय तरी काय ? असा सवाल नागरिक विचारत आहेत. मात्र रशियाच्या पूर स्थितीच उदाहरण देत पालिका प्रशासनाची बाजू सावरली आहे.सध्या मालाड दुर्घटना स्थळी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्याचे काम सुरु आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

