बीड : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या आणि तंबाखूमिश्रित पदार्थ विक्री करणारी दुकाने 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यावर थुंकणे किंवा धूम्रपान करण्यामुळे कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव होऊ शकतो असे लक्षात आल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असेही आदेशात सांगितले गेले आहे .
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नाभिक एकता मंच संघटनेने नागपूर जिल्ह्यातील सलून दुकाने पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलून दुकानात दाढी, कटिंग बनविण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. लोक एकत्रित बसतात, त्यावेळी संक्रमण होऊ नये म्हणून असे एकत्रीकरण टाळण्यासाठी काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपुरात दारुची दुकानं बंद करण्यात आली आहेत. अनेक शहरात बार, पब्जचंही शटर डाऊन करण्यात आले असून रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना 200 ऐवजी हजाराचा दंड ठोठावण्यात येत आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आजपासून मुंबईतली 50 टक्के दुकानं बंद करण्यात आली आहेत.


