🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा– गेल्या चोवीस तासात पुणे विभागात महाबळेश्वर वगळता कोणत्याही धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली नाही. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातूनही 4 लाख 50 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे विभागातील पूरस्थिती नियंत्रणात येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी पातळी 2 फुटांनी कमी झाली आहे. सांगलीतील पाणी पातळी मात्र फक्त 3 इंचांनी कमी झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात येत्या 48 तासात हवामान विभागाच्यावतीने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
विभागातील 2 लाख 85 हजार 261 लोकांचं सुरक्षित स्थळी स्थानांतर करून त्यांची 480 शिबीरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. पुरात मृत्युमुखी पडलेल्या 29 जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आले असैन 11 जण अजून बेपत्ता आहेत. सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि सांगलीवाडी इथे पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जेवणाची पाकीटं आणि पाणी पुरविण्यात आलं आहे. याच हेलिकॉप्टरव्दारे त्यांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यात दिली.
शासनाकडून पुणे विभागासाठी 76 कोटींचे अनुदान आलं असून त्यामधून पूरबाधित शहरी कुटुंबांना 15 हजार तर ग्रामीण भागातील कुटुंबांना 10 हजारांची मदत देण्यात येणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितलं. शासनानं अतिवृष्टी पुरामुळे बाधीत कुटूंबाना अन्न धान्य वितरीत करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रति कुटूंब 10 किलो गहू आणि 10 किलो तांदुळ मोफत पुरविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मदत कॅम्पमधील स्थलांतरीत व्यक्तींना शिजवलेलं अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक साहित्य पोहोचवण्यात येत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये या वस्तू रस्त्यानं तर कोल्हापूर ला हेलिकॉप्टर द्वारे पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. आर्थिक मदत करायची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले.राज्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरामुळे 13 जिह्यातील 77 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 2 लाख, 1 हजार, 496 हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता असून, त्यापैकी फळबागांना पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून 100 टक्के अनुदान देवून पुनर्उभारणीसाठी मदत केली जाणार असल्याची माहिती राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.
पूरग्रस्तांना मिळणारा निधी थेट बँकेत; राज्य सरकारचा निर्णय
पूरग्रस्तांना मिळणारा निधी थेट बँकेत; राज्य सरकारचा निर्णय
निर्लज्ज आणि कोडगं सरकार इतिहासात कधी पाहिलं नाही : कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

