🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेला धक्कावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. २१ जून रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर यांची ईडी चौकशी सुरु होती. पुढे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली. यानंतर आता थेट शिवसेनेचा बुलंद आवाज असणारे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस मिळाली आहे. २८ जून रोजी चौकशीला जावे लागणार आहे. यावर युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे हे नेरळमधील मारहाण झालेल्या शिवसैनिकांची पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सर्वांचं प्रेम आमच्यासोबत आहे. जे दगाफटका करतात, पळून जातात ते जिंकत नाहीत. असं ते म्हणाले. तसेच पुढे संजय राऊतांना ईडी नोटीस मिळाल्यासंबंधी बोलताना देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. हे राजकारण नाही, आता सर्कस झाली आहे. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना पत्राचाळ पुनर्विकास घोटाळाप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसीनंतर लगेच संजय राऊत यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. “मला नुकतेच कळले की ईडीने मला समन्स बजावले आहे. चांगले! महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठी लढाई लढत आहोत. मला रोखण्याचे हे षडयंत्र आहे. तुम्ही माझा शिरच्छेद केला तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. मला अटक करा! जय हिंद!”, असे ट्वीट करत थेट इशारा राऊतांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


