टीम महाराष्ट्र देशा: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. ओमराजे यांनी जवळपास १ लाख २४ हजारांपेक्षा जास्त मतांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे ओमराजे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा गड राखला आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यंदा पारंपारीक विरोधक पाटील विरुद्ध निंबाळकर सामना पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राणाजगजितसिंह पाटील तर शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारामध्ये दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती.
शिवसेनेकडून विद्यमान खा रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापत ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गायकवाड समर्थकांत नाराजीचा सूर पहायला मिळाला. निंबाळकरांच्या रणनीतीची धुरा सांभाळणारे आ तानाजी सावंत यांच्यावर देखील शिवसैनिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र अखेर मतदारांनी ओमराजे यांच्या पारड्यात आपल्या मतांचे माप टाकले आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना ५ लाख ७८ हजार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राणाजगजीतसिंह पाटील यांना २ लाख ५४ हजार, वंचित बहूजन आघाडीचे अर्जुन सलगर यांना ९६ हजार ६०० पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. या लढतीमध्ये निंबाळकर १ लाख २४ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
