🕒 1 min read
मुंबई – वर्तमान परिस्थितीत मागच्या पाच दिवसापासुन संपुर्ण मराठवाड्यात अति पावसाने धुमाकुळ घातला असुन बारा जणांचा मृत्यू झाला तर तब्बल 800 लहान मोठी जनावरे पावसाने दगावली. खरीपाचे पिक शंभर टक्के वाया गेले असुन कापुस, सोयाबीन कंबराएवढ्या पाण्यात आहेत. ऊसाचे पिक आडवे झाले. एकुणच काय तर शेतकरी उद्धवस्त झाला.माय-बाप सरकारने ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना तात्काळ बांधावर प्रति हेक्टरी 50,000 रूपये देण्याची गरज आहे अशी मागणी भाजप राज्य प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी मागणी केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले, राज्यातील ठाकरे सरकारवर आता मराठवाड्यातील जनतेचा विश्वास राहिलेला नाही. मागच्या दोन वर्षापासुन जाणिवपुर्वक सरकार मराठवाड्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टी अनुदानाचे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांना कवडीचा विमा मिळाला नाही आणि आता उद्धवस्त शेतकरी झाला तरी सरकार मदत करेल का नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे. पाच-सहा मंत्री असुन एकही मंत्री अद्याप शेतकऱ्यांचे अश्रु पुसायला सुद्धा गेल्याचं कुठं ऐकिवात नाही. दहा दिवसात 250 मंडळात अतिवृष्टी आणि 250 लाख हेक्टरवर पिके पाण्याखाली गेली. महापुराने जमिनी खरडुन उद्धवस्त झाल्या.एवढी भयानक परिस्थिती कधीच झालेली नव्हती. पंचनामे, पाहणी कागदोपत्री घोडे नाचवण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना सात-बारा बघुन मदत करण्याची गरज आहे.
मागच्या दहा दिवसापासुन मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत असुन अनेक जिल्ह्यात अति पाऊस झाल्याने खरीपाची पिके 100 टक्के उद्धवस्त झाली आहेत. सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर काही जिल्ह्यात दुप्पटीने पाऊस पडला. नाही म्हटलं तरी दहा दिवसात 250 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. एकुण अडीच लाख हेक्टर जमिनीवरील पिके आजही कंबराएवढ्या पाण्याखाली असुन सोयाबीन, कापुस, तुर 100 टक्के उद्धवस्त झाली आहेत. ऊसाचे पिक पुराच्या तडाख्यात सापडले तर भुईसपाट पावसाने झाले. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार.महापुरामुळे मराठवाड्यातील लहान-मोठे एकुण 800 जनावरे दगावली तर 12 लोकांचा जीव पाण्यात वाहुन गेला आहे. अनेकांची पक्की घरे पडली. जनावरांची गोठे व इतर नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं. एकुण पर्जन्यमान टक्केवारीच्या तुलनेत पाऊस 109 टक्के जास्त मिमि झालेला आहे. वर्तमान परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य माणुस फार मोठ्या संकटात सापडला असुन शेतकरी 100 टक्के उद्धवस्त झाला आहे. वास्तविक पाहता मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करून सरकारने तातडीची मदत द्यायला हवी. नैसर्गिक संकटात पंचनामे, पाहणी दौरे ही नाटकं करून कागदोपत्री घोडे हे सरकार राबवत आहे. कोकणात पावसाने धुमाकुळ घातला. पश्चिम महाराष्ट्रात अजुन पंचनामे सुरूच आहेत. खरं तर अशा नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना अवघ्या काही तासांत बांधावर जाऊन रोखीने मदत करण्याची गरज आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात प्रचंड पाऊस ज्यामुळे खरीपाचे पिक वाया गेले. सात-बारा पाहुन सरसकट मदत खऱ्या अर्थाने सरकारने द्यायला हवी. यापुर्वी कधीच पाऊस पडला नाही. त्यापेक्षा कितीतरी पटीने पाऊस अनेक मंडळात झाल्याचे चित्र समोर येत आहे.
नदी, नाल्या, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. रोज कोसळणाऱ्या पावसाची भिती जनतेच्या मनात असुन माईस लेकरू पारखं असं चित्र डोळ्यासमोर दिसत असताना सरकार मात्र डोळ्यावर पट्टी बांधुन बसल्यासारखं कसं बघतं?हाच प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे. एक गोष्ट खरी आहे राज्यातील ठाकरे सरकारवर मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वासच राहिलेला नाही. या सरकारमध्ये पाच ते सहा मंत्री मराठवाड्यातुन आहेत. असे असताना मागच्या दोन वर्षात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान त्याचा पैसा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेल्या योजना ज्यात वॉटरग्रीड योजना कार्यान्वित होवु दिली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना विमा दोन वर्षात कवडीचा मिळाला नाही. राजकिय दुराग्रह ठेवुन हे सरकार मराठवाड्यातील जनतेच्या भावनेशी खेळत आहे. विद्यमान सरकारमधील मंत्री सत्तेच्या चंगळवादात मश्गुल असुन अतिवृष्टीने झालेलं नुकसान पाहण्यासाठी येण्यास त्यांना वेळही नाही.
अगोदरच विमा मिळाला नाही म्हणुन शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे. 2019-20 पासुन कवडीचा विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. करोडो रूपये शेतकऱ्यांचे विमा कंपनीने लुबाडले. त्यात सत्ताधाऱ्यांनी आर्थिक हात धुवुन घेतले पण शेतकऱ्यांच्या पदरात विमाच पडु दिला नाही असं हे सरकार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संकटात आता हे सरकार मदत करेल का नाही?यावरच सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा भरवसा राहिलेला नाही. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि चित्र पाहता या सरकारने कागदोपत्री घोडे नाचवण्याची आता वेळ निघुन गेलेली आहे. काही मदत करायची असेल तर शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन संकटात सापडलेल्या लोकांना प्रशासनाच्या वतीने रोखीच्या स्वरूपाने मदत केली तरच दिलासा मिळु शकेल. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे दोन वर्षापुर्वी सत्तेत नसताना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानपोटी रूपये 50,000 हेक्टरी द्यावेत अशी मागणी करत होते आणि आता मागणी करणारेच राज्यात माय-बाप झाले. मग त्यांची हेक्टरी 50,000 रूपायाची मागणी गेली कुठं? याची आठवण आता शेतकरी करून देताना दिसत आहेत.
ठाकरे सरकार चालवणारे राष्ट्रवादीचे नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेबांची भुमिका नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याची दिसतच नाही.कारण पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात निसर्गामुळे झालेलं प्रचंड नुकसान ज्यातुन जनता अद्याप सावरलेली नाही. त्या लोकांना आजही कवडी मदत या सरकारने दिलेली नाही. त्यापेक्षा कडवी नजर मदतीच्या बाबतीत ठाकरे सरकारची मराठवाड्यावर नकारात्मक राहिलेली आहे. अनेक जनहिताच्या योजना रद्द केल्या. साधं क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला मंजुर झालेलं रातोरात पुण्याला हलवलं यावरूनच सत्ताधाऱ्यांची नियत या विभागासाठी कशी आणि किती आहे? हे लक्षात येतं. कोरोनासारख्या संकटात आरोग्याची साधन सामुग्री गोरगरीबांच्या जीव रक्षणासाठी वेळेवर मिळालेली नाही. त्यापेक्षा अधिक एखाद्या महत्वाच्या इंजेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार मराठवाड्यात झाला. त्यामुळे आता एवढं संकट नैसर्गिक आलं असताना शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला सरकार कशा प्रकारे मदत करणार? किंवा करणार का नाही? याबाबत लोकांच्या मनात फार मोठा संशय निर्माण झालेला आहे.
साधा विमा जरी शेतकऱ्यांना दिला तरी या संकटावर मात करायला बळ निश्चित येईल. पण सत्ताधाऱ्यांनी विमा कंपनीसोबत अफरातफर करून आर्थिक लाभ घेतल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असुन शेतकऱ्यांना विमा मिळणारच नाही हे चित्र आता दिसत आहे. सरकार कुठल्याही पक्षाचे असो. सामान्य जनतेसाठी माय-बाप असतं. ठाकरे सरकारने मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर राजकारण न करता संकटात आर्थिक हातभार लावावा अशी मागणी जनता करत आहे. अशा संकटात हेक्टरी 50,000 रूपये रोख शेतकऱ्यांच्या बांधावर येवुन दिले तरच शेतकरी जगेल आणि ओला दुष्काळ जाहिर करून त्याचे निकष लावण्याची मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. सद्या तरी मराठवाड्यात अतिपावसाने धुमाकुळ घातला असुन खरीपाची पिके 100 टक्के वाया गेली आहेत. हवामान अंदाजानुसार चालु महिन्यात प्रचंड पाऊस पडणार. त्यामुळे खरीपाचं कुठलंही पिक पदरात पडणारच नाही. सरकारने डोळे उघडावेत आणि संकटात मदत करावी अशी मागणी आम जनता करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
