🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबादेत मंगळवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण शहरात एकच दाणादाण उडवली. अर्धे शहर पाण्यात बुडाले होते. अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली, तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. अग्निशमन विभागाला मुसळधार पाऊस सुरु झाल्याच्या काही वेळातच नागरिकांचे कॉल्स येण्यास सुरुवात झाली होती. शहरातील एकंदरीत परिस्थिती पाहता अग्निशमन विभागाच्या गाड्यांची कमतरता दिसून येत आहे. मात्र आम्ही आमच्या परिने संपूर्ण प्रयत्न करत असून अग्निशमन विभागाचे कर्मचारी ठिकठिकाणी उन्मळून पडलेली झाडे उचलत असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने पंपिंगही सुरु झाल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख आर. के. सुरे यांनी दिली.
सकाळपासून धो धो कोसळलेल्या पावसाने शहर जलमय झाले होते. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. आपदाग्रस्त भागातून नागरिकांच्या मदतीसाठी अग्निशमन दलाला फोनवर फोन धडकले. मात्र विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तसेच वाहनांच्या कमतरतेमुळे वेळीच मदत पोहोचण्यात अग्निशमन दलाला अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मनपा मुख्यालयातील परिसरातच दोन झाडे कोलमडून पडली होती. पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांवर हि झाडे पडल्याने गाड्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पार्किंग भागातही झाडे कोसळल्याने नुकसान झाले.
उल्कानगरीतील स्मशानभूमीत, कैलास नगर चौकात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोंढे साचले होते. एन-६, एन-७, मयुरपार्क, श्रेयनगर भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. बालाजी नगर भागात पाण्याच्या लोंढ्यामुळे रस्ता ब्लॉक झाला असून नागरिकांना पर्यायी रस्ता वापरण्याची वेळ आली आहे. औरंगपुरा, झेडपी मैदानावर देखील पाणी साचले होते. या सर्व ठिकाणाहून आत्तापर्यंत अग्निशमन विभागाला मोठ्या प्रमाणावर कॉल्स आले होते. या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील संपूर्ण टीम्स आणि गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अजूनही येणाऱ्या कॉल्सचा ओघ सुरु असून प्रत्येक ठिकाणी अग्निशमनच्या गाड्या पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. समृद्धी महामार्गालगतच्या पुलाजवळील विजेचे दोन पोल कोसळले आहेत. त्यामुळे सावंगी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तीन नेते म्हणजे शिवसेना नाही; ‘तेव्हा’ का ओरड केली नाही?’
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- ‘तुमचा मधुर आवाज…’ मोदींनी लता मंगेशकरांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- देशातील ३० विधानसभा आणि ३ लोकसभेच्या पोटनिवडणुका जाहीर
- ‘मंत्रीमंडळात जागा मिळवण्यासाठी आमदार जयस्वालांचा खटाटोप’; विजय वडेट्टीवारांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
