बीड : शहरातील एका व्यक्तीला ॲप डाऊनलोड करायला सांगून भामट्याने बँक खात्यातून २५ हजार रुपये लांबवले. ही घटना २७ मे रोजी शहरातील अंकुशनगरात घडली.
आसाराम बापूराव खंदारे (३६, रा. कारेगव्हाण ता. बीड, ह.मु.अंकुशनगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी (दि. २७) दुपारी चार वाजता खंदारे यांना विनय शर्मा (रा. मुंबई) या नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. त्याने ‘मी बीएसएनएलच्या मुंबई केअर ऑफिसमधून बोलतोय’ असे सांगून खंदारेंचा विश्वास संपादन केला. केवायसीक्यूएस हे ॲप डाऊनलोड करायला भाग पाडले.
त्यानंतर खंदारेंच्या एसबीआयमधील खात्याविषयी गोपनीय माहिती घेत २५ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर खंदारेंनी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेतली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. तपास पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे करत आहेत.
जमीन खरेदी व्यवहारात व्यापाऱ्याची फसवणूक
२० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीतील ४ गुंठे जमीन परस्पर ठेका पद्धतीने देऊन ग्रामपंचायतीचा पीटीआर तयार करत फसवणूक केल्याचा प्रकार अंबाजोगाईतील चनई परिसरात घडला. या प्रकरणी सहा जणांवर अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा नोंद केला. प्रकाश झुंबरलाल सोळंकी (रा. रिंग रोड, अंबाजोगाई)असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी २००१ मध्ये चनई शिवारातील गट क्र. ६५ मध्ये शेती खरेदी केली होती. मात्र, जमीन खरेदी व्यवहारानंतर शेख वजीर शेख चांद याने मिळकतीत हक्क दाखवून सातबाराला नोंद घेतली.
त्यानंतर जमीन शेख सलीम साहेबलाल यास विक्री केली. तेव्हा हक्क सोडण्यासाठी सोळंकींकडून शेख वजीर याने पैसे घेतले; परंतु त्यानंतरही सायरा बेगम अब्दुल रज्जाक यांच्या नावे चार गुंठे जमीन ठेका पद्धतीने केली व बनावट कागदपत्राआधारे ग्रामपंचायतीच्या पीटीआरला नोंद घेतली. प्रकाश सोळंकी यांच्या फिर्यादीवरून शेख वजीर शेख चांद, शेख नजीर शेख चांद, शेख शब्बीर शेख चांद, शेख सलीम शेख साहेबलाल, शेख अमीरोद्दीन शेख सईदोद्दीन व सायराबेगम अब्दुल रज्जाक शेख यांच्यावर गुन्हा नोंद केला.
महत्त्वाच्या बातम्या
- पीक विमा मिळत नसल्याने महिला शेतकरी करणार आंदोलन
- ‘गायकवाड अहवाल हा उद्धव ठाकरेंना समजलाच नाही’, संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका
- दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- ‘तुटवडा असताना खासगी रुग्णालयांना लस कशी मिळते?’, ‘आप’चा केंद्राला सवाल
- ‘पश्चिम बंगालसाठी मोदींच्या पायाही पडले असते, पण अपमान असह्य’, ममता बॅनर्जींचा पुन्हा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

