मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार नसून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी मंत्र्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. ‘महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु आहे. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नाहीत. आता कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता राज्यपालांना निवेदन दिले. ही मराठा समाजाची दिशाभूल आहे. मुख्यमंत्री महोदय समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका,’ अशा शब्दात आशिष शेलार यांनी आघाडी सरकारच्या कारभाराचा समाचार यावेळी घेतला.
तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होती का प्रश्न पडतोय. तसेच योग्य नियोजन आणि अभ्यास न करता राज्यपालांना निवेदन दिले आहे. राज्यपालांना निवेदन देण्याआधी तज्ञांच्या समितीचे मत जाणून घेतले नाही. विरोधी पक्षाशी चर्चा केली नाही. विधानसभेत चर्चा झालेली नाही. मराठा समाजाच्या संघटनांशी चर्चा केली नाही. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची तयारी न करता राज्यपालांना निवेदन देऊन मराठा समाजाची फसवणूक राज्य सरकार करते आहे. मराठा समाजाला कृपया एप्रिल फुल्ल करु नका, असे ही आशिष शेलार म्हणाले.
दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण देताना आरक्षणाचा कायदा हा फुलप्रुफ असे सांगितले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यावर ठाकरेंनी टोला लगावला आहे. ‘मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रुफ असता तर आज राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आली नसती,’ असं म्हणत फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्यावर खापर फोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगाल हिंसाचार; भाजपच्या ७७ आमदारांना केंद्राकडून सुरक्षा
- ‘रेमडेसिवीर बारामतीत मिळते पण जामखेडला नाही’, माजी मंत्री राम शिंदेंची पवारांवर टीका
- बीडला मिळाला श्वास; ३७१ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जिल्ह्यास प्राप्त
- ‘कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे विमा योजनेचा लाभ द्या’, शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे आपले कर्तव्य ; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


