🕒 1 min read
बीड : स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे १६ वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होऊन सुरू झाले होते. आता त्यांच्या सुनेच्या म्हणजेच भाजप आ.नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याकरिता ११ कोटी ३१ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच लोखंडी सावरगाव शिवारात गट क्र.६३ मध्ये दहा एकरात आरटीओ कार्यालयाची सुसज्ज आणि अद्यावत इमारत उभी राहणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री तथा दिवंगत नेत्या डॉ.विमलताई मुंदडा यांनी २००४ साली अंबाजोगाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रयत्नपूर्वक मंजूर करून घेतले होते. कार्यालयासाठी लोखंडी सावरगाव परिसरात गट क्र.६३ मधील दहा एकर जमीन देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. या कार्यालयामुळे अंबाजोगाईसह परळी, माजलगाव, केज, धारूर आणि वडवणी या तालुक्यातील वाहनधारकांची मोठी सोय झाली.
सुरुवातीला हे कार्यालय यशवंतराव चव्हाण चौकात भाडेतत्वावर खासगी जागेत होते. त्यानंतर ते जोगाईवाडी शिवारात हलवण्यात आले. तर, जड वाहनांची तपासणी आणि चालक परवान्याच्या चाचण्या मात्र चार किमी अंतरावर लोखंडी सावरगाव परिसरातील तकलादू ट्रॅकवर घेण्यात येतात. मुबलक जागेअभावी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनाही विविध कामांसाठी दोन-दोन ठिकाणी धावपळ करावी लागते. त्यामुळे अंबाजोगाई येथील कार्यालयासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज इमारत बांधण्यात यावी, यासाठी आ.नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी मागील एक वर्षापासून पाठपुरावा केला होता.
औरंगाबाद येथील उपमुख्य वास्तूविशारद यांच्याकडून बांधकामाचा नकाशा तयार करण्यात येऊन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून परिवहन विभागास पाठविण्यात आला. आ.नमिता मुंदडा यांच्या वतीने अक्षय मुंदडा यांनी मुंबईत मुक्काम ठोकून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा प्रस्ताव विविध पातळ्यांवर पुढे ढकलण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर परिवहन विभागाने सदर इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी देत ११ कोटी ३१ लाखांची तरतूद केली आहे. या मंजुरीमुळे आरटीओ कार्यालयाला स्वतंत्र आणि सुसज्ज इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या इमारतीच्या माध्यमातून स्व.विमल मुंदडा यांचे स्वप्न त्यांच्या स्नुषा आ.नमिता मुंदडा यांनी पूर्ण केल्याचे पाहायला मिळतेय.
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
