औरंगाबाद : वाढत्या कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगल कार्यालये व कोचिंग क्लासेसवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. १८ फेब्रुवारीपासून पालिकेच्या नागरी मित्र पथकांनी कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी ४३ कोचिंग क्लासेसची तपासणी करत सहा क्लासेसवर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र कारवाईच्या भितीने १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील क्लासेसचे दार बंद करण्यात आले आहेत. इतर वर्गांसारखे हे विद्यार्थी देखील ऑनलाईनच शिक्षण घेत आहेत.
मागील आठवडाभरातच कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या हजारच्या घरात गेली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने इयत्ता पाचवी ते नववी आणि अकरावीच्या सर्व माध्यमांतील शाळा व कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जारी केले आहेत. तर दहावी व बारावीचे वर्ग व कोचिंग क्लासेस सुरू ठेवण्यास मुभा दिली असली तरी येथे कोरोना नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जात आहे. नियमांचे पालन होते आहे की नाही, हे तपासण्यासाठी पालिकेने नागरी मित्र पथके कामाला लावली आहे.
महापालिकेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, १० वी १२ वी इयत्तेचे शैक्षणिक महत्व लक्षात घेता, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व कोरोना नियमांचे पालन करीत वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मनपाने परवानगी देऊनही अनेक कोचिंग क्लासेस सध्या पूर्णतः बंद आहेत. कारण या नियमांचे पालन न केल्याच्या कारणामुळे अनेक क्लासेसला मोठ्या प्रमाणावर दंड बसला आहे. या भीतीपोटी क्लासेस कडून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू आहे. बारावीच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत. तरीही अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दंडाच्या भितीनेच बंद : महापालिकेने १० वी १२ वी साठी परवानगी दिली असली तरीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व वर्ग ऑनलाईनच सुरु ठेवल्याचे शहरातील अनेक नावाजलेल्या खाजगी क्लासेसने ‘महाराष्ट्र देशा’ला सांगितले. तसेच अनेक छोट्या क्लासेसमध्ये जागेच्या अभावी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकत नाही. त्यामुळे दंडाच्या भितीने या क्लासेस धारकांनी संपूर्ण क्लासेस बंद ठेवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली भूषणसिंह राजे होळकरांनी मागणी
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांवर देखील निर्बंध
- ‘पालघर साधू हत्याकांडापासून पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे’
- विमानप्रवाशांसाठी खुशखबर! नांदेडहून जळगाव, अहमदाबादला विमानसेवा

