🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा ; उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आधी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे आणि मगच लोकांना मते मागावी, अन्यथा आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा कठोर शब्दात कन्नडचे माजी आमदार तथा मनसेचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला सरळ इशाराच दिला आहे.गेली अनेक वर्ष औरंगाबादचे संभाजीनगर करणार या एकाच मुद्द्यावर शिवसेनेने आपली राजकीय पोळी भाजून घेतली, आणि आता पुन्हा संभाजीनगर आणि हिंदू-मुस्लीमच्या मुद्द्यावर शिवसेना महापालिका निवडणूक लढू पाहत आहे.यावर हर्षवर्धन यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.
महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत सुरु करण्यात आलेल्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी हर्षवर्धन जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेला आव्हान दिले आहे.
जाधव म्हणाले, ”शिवसेना आणि त्यांच्या सगळ्याच नेत्यांनी आता जनतेची दिशाभूल करण्याचे काम बंद करावे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करणाऱ्या शिवसेनेने अद्याप या शहराचे अधिकृत नामकरण केलेले नाही .आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी संभाजीनगरची घोषणा करतील असे सांगत आहेत. त्यांना माझे आव्हान आहे की, दोन महिन्याच्या आत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे आणि त्यानंतरच लोकांकडे मत मागावीत अन्यथा आम्ही त्यांना प्रचारासाठी शहरात फिरू देणार नाही.
जाधव यांनी नुकताच मनसेत प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बंडखोरी करत हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या पराभवाला मोठा हातभार लावला होता. त्यानंतर आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला थेट अंगावर घेतले आहे.

