🕒 1 min read
मुंबई : मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला होता. पुतळा हटवण्यास असलेला विरोध लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने रातोरात बुल्डोझर चालवून चौथरा उद्ध्वस्त केला. त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आणि स्थानिक युवकांनी नागपूर-छिंदवाडा महामार्ग काहीकाळ अडवून धरला होता.
काँग्रेसच्या राज्यात सावरकरांनंतर आता शिवरायांचा अवमान होत आहे असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा व्हीडीओ शेअर केला आहे.
काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात सत्तास्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रणित सरकारला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंग चौहान यांनी टीका करत प्रश्न विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद मध्य प्रदेशात आता चांगलाच पेटला आहे आणि त्याचे लोणं आता महाराष्ट्रातही येतील अशी चिन्ह आहे.
याच पार्श्वभूमीवर शाहूमहाराज वंशज समरजितसिंह घाटगे यांनी देखील फेसबुक पोस्ट लिहित या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्रात प्रत्येक मनात आपलं अढळ स्थान आहे. परंतु आज हे दुर्दैव आहे की तुमच्या नावाने इथे तुमचेच भारतवासी आपापसात भांडत आहेत. तुमच्या नावाचा उपयोग हा प्रेरणेपेक्षा चुकीच्या राजकारणासाठी अधिक केला जात आहे,’ असे म्हणत घाटगे यांनी याप्रकाराबाबत खंत केली आहे.
वाचा काय आहे फेसबुक पोस्ट
छत्रपती शिवाजी महाराज,
स न वि वि,
महाराष्ट्रात प्रत्येक मनात आपलं अढळ स्थान आहे. किंबहुना अखंड भारतात आहे. तुम्ही स्वराज्यासाठी अखंड आयुष्य लढलात. अखंड हिंदुस्थान निर्माण व्हावा म्हणून अटकेपार झेंडा रोवलात. परंतु आज हे दुर्दैव आहे की तुमच्या नावाने इथे तुमचेच भारतवासी आपापसात भांडत आहेत. तुमच्या नावाचा उपयोग हा प्रेरणेपेक्षा चुकीच्या राजकारणासाठी अधिक केला जात आहे. वंदनीय तुमच्या नावाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय दृष्टीने हवा तसा मोडून वाकवून केला जात आहे. हे सर्व कमी म्हणून की काय आज मध्यप्रदेश येथे तुमचा पुतळा पाडण्यात आला. पुतळा दुसरीकडे लावायचा असावा त्याशिवाय हे असे कृत्य घडूच शकणार नाही असा जरी विचार केला तरी पाडण्याची पद्धत सर्वच शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदना देणारी ठरली आहे. हीच कृती सन्मानपूर्वक पद्धतीने देखील करता आली असती. आज तुमची मूर्ती खाली पडू नये म्हणून ती छातीवर झेलून धरणाऱ्या तरुणांना पाहून आमचा ऊर अभिमानाने भरून आला. महाराज हे तुमच्यावर असलेले आमचे निव्वळ प्रेम नाही तर आमची तुमच्यावर असलेली श्रद्धा आहे. आज मी एक सुसंस्कृत मराठी नागरिक म्हणून तुम्हाला एकच सांगू शकेन, महाराज आम्ही कमी पडलो, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात हा महाराष्ट्र कमी पडत आहे. आता सर्व युवकांना तुमच्या वतीने हे कोण सांगू शकेल की माझ्या नावाने होणारे हे राजकारण थांबवा. माझे स्वप्न, माझे राष्ट्रप्रेम, माझा स्वराज्याचा उद्देश या मागे धाव घ्या. माझ्या नावाने आपापसात भांडण लावणाऱ्या चुकीच्या राजकारणी लोकांपासून लांब रहा. कोण सांगेल??
आपला विनम्र सेवक,
समरजितसिंह घाटगे ( शाहूमहाराज वंशज )
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे. तसेच मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापिही सहन करू शकत नसल्याचंही संभाजीराजेंनी अधोरेखित केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
