टीम महाराष्ट्र देशा: केशरी रंगाचा नवा हिंदुस्तान, तिळगुळा संगे वाढवू महाराष्ट्र धर्माची शान, असा नारा देत मनसेच्या वतीने पुण्यात शहरवासीयांना भगव्या रंगाचे तिळगुळ वाटत मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला.
भगव्या रंगाचे तिळगुळ देत ‘आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत’ हा मुद्दा मनसेने अधोरेखित केला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी मनसे मुख्य कार्यालयात भगव्या रंगाच्या फ्लेक्सवर शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता मनसेचे इंजिन आता हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडून धावणार असेंच वाटते आहे.लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा लोकांसमोर मांडला होता.पण तो काही आपले कमाल दाखवू शकला नाही.
त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. पण मनसेला हवं तसं यश मिळालं नाही. पुण्यात कोथरुड सारख्या जागेवर किशोर शिंदे यांना भाजप विरोधात आघाडीने पाठिंबा दिला होता. पण निकालानंतर मनसे महाविकास आघाडीसोबत गेली नाही. त्यामुळे तीन पक्षाच्या सरकारबद्दल राज ठाकरे यांची भूमिका काय याची उत्सुकता मनसैनिकांसह सर्वांनाच लागली आहे.
येत्या २३ तारखेला मनसें अधिवेशन घेणार आहे त्यात काय निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

