मुंबई – राज्यात येत्या 6 दिवसात 90 लाख नागरीकांचं लसीकरण करण्याच्या उद्देशानं मिशन कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहिमेची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल केली. आजपासून 14 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत दररोज 15 लाख जणांना लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत.
राज्यातील सव्वानऊ कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी सहा कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं असून आणखी सव्वातीन कोटीपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण शिल्लक आहे. लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
या विशेष मोहिमेसाठी लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सिरिंजसह मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी या अभियानात इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था अशा संस्थांसह समाजातल्या विविध घटकांना सहभागी करुन घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातल्या कोविडमुळं मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केली. यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीमधून 700 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. कोरोनामुळे राज्यातले 1 लाख 40 हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यासाठी पोर्टलवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना माहिती भरावी लागेल. त्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील, असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘ड्रग्ज प्रकरणाचे राजकारण करणाऱ्या मलिक यांनी ते पालकमंत्री असलेला जिल्हा वाऱ्यावर सोडला’
- सोलापुरात कॉंग्रेसला पडले खिंडार; दिग्गज नेत्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- ‘देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात आल्याने खेळांना प्रोत्साहन मिळत आहे’


