औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या काळात महापालिकेने बाधितांवर उपचार करणे, कोरोना चाचण्या करणे, आरोग्य तपासणी यासह इतर कामांसाठी डॉक्टर्स, नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नियुक्ती केली होती. दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने नागरिक बाधित झाले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८०० पर्यंत गेली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्ण संख्या कमी झाल्याने सद्यस्थितीत मनपाने कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आयटक संलग्नित महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे ही लक्ष द्या अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू कमी केली जात आहे. सध्या महापालिकेत सुमारे ६०० कर्मचारी कार्यरत होते. यातील दुसऱ्या लाटेत नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यामुळे डॉक्टर्स, कर्मचारी महापालिकेत येऊन थकीत वेतन देण्याची मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी डाटा एन्ट्री कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. पण शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्याने डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. कोविड काळात नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे वेतन सुमारे दोन कोटींच्या घरात आहे.
६१४ कर्मचारी वेतनाच्या प्रतिक्षेत
कोरोना काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अतिशय जोखमीची कामे केली. अगोदरच तुटपुंज्या पगारावर काम केलेल्या या कोविड योद्ध्यांना उधाऱ्या करून ड्यूटीवर यावे लागले व घर चालवावे लागले. पगार मागायला गेले तर त्यांच्यावरच दमदाटी करण्यात आली. ही देखील अत्यंत खेदजनक बाब असून ६१४ कोविड योद्ध्यांचा ६ महिन्यांचा पगार देण्यासाठी व त्यांना पूर्ववत कामावर घेऊन पुढील पगार करण्यासाठी महानगर पालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे ‘आयटक’द्वारे करण्यात आली आहे. यात कॉ. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ, गजानन खंदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीचा धडाका सुरूच; आता ‘या’ काँग्रेस नेत्याला बजावला समन्स
- राज्यातील सरकार स्थिर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
- ‘मेकिंग दि तालिबान ग्रेट अगेन’; अमेरिकेत बायडेन यांचे होर्डिंग्स
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले ‘हे’ सूचक वक्तव्य महत्वाचे-जयंत पाटील


