🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कपमध्ये यजमान इंग्लंडने भारतावर ३१ धावांनी मात करत शानदार विजय मिळवला आहे. करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने विजय मिळवत सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर भारताला या स्पर्धेतल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
इंग्लंडने भारताला विजयासाठी ३३८ धावांचे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ५० षटकात ३०६ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनेही ७६ चेंडूत ६६ धावा फटकावल्या. तसेच हार्दिक पांड्याने ४५ तर धोनीने नाबाद ४२ धावांची खेळी केली तरीही भारताला विजयी लक्ष्यापर्यंत पोहचता आले नाही. इंग्लंडकडून प्लंकेटने ३ तर वोक्सने २ गडी बाद करत भारताला विजयापासून दूर ठेवले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. जॉनी बेयरस्टोने शानदार शतक लगावत १११ धावांची खेळी केली तसेच रॉयने ६६ धावा केल्या. अंतिम षटकांत बेन स्टोक्सने शानदार फटकेबाजी करत ७९ धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने ५ तर बुमराह आणि कुलदीप यादवने एक-एक गाडी वाद केला.
दरम्यान, हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंड आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे इंग्लंड सेमीफायनलच्या रेसमध्ये कायम आहे. तर इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
