मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या देश आणि कंपन्यांना जागतिक बँकेनं 14 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे. 120 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचं संकट उद्भवल्यामुळे, अपेक्षित असलेल्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच, सार्वजनिक आरोग्य सुविधा मजबूत करणे, त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्राला मदत करणे हा यामागचा उद्देश आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्वालालांपूर विमानतळांवर अडकलेल्या 200 भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं एअर एशियाच्या उड्डाणांना मंजूरी दिली आहे. या 200 जणांमध्ये बहुतांश भारतीय विद्यार्थी असून त्यांना क्वालालांपूर विमानतळावर कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना संबंधी जागृती करण्याचे कार्यक्रम हाती घ्यावेत असं आवाहन मोदी यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

