गडचिरोली : बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित घराजवळ पोहोचण्यासाठी आम्ही कार्य करत असून जिल्हा सीमेवर आलेल्या प्रत्येक मजुराला मोफत बसेसची व्यवस्था करणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केले.
जिल्ह्यातील 16800 मजूर जिल्ह्याबाहेर ठिक ठिकाणी कामासाठी गेलेले असून त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील 6713 व 799 इतर जिल्ह्यामधून मजूर परतलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मजूर आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यात अडकलेले आहेत. संबंधित स्थानिक प्रशासनाकडून त्यांना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आणून सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मजूर पायी स्व-गावी जाण्यासाठी निघत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या सर्व मजूरांना आपल्या गावी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता मोफत बसेसची व्यवस्था करत असल्याचे आज जाहीर केले.
आंध्रप्रदेशमधून उद्या एक हजार मजुरांना घेऊन वडसा येथे रेल्वे येत आहे. त्यातील जिल्हयातील 7 तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मजुरांना मोफत बसद्वारे पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाकडून त्यांची वैद्यकीय तपासणीही यावेळी केली जाणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोनाबाबत माहिती दिली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता व इतर महत्त्वाच्या विभागाचे विभाग प्रमुख बैठकीला उपस्थित होते.
प्रशासनाला सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन :
आपला जिल्हा जनतेने प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळेच ग्रीन झोनमध्ये आहे. अशा कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी यापुढेही आपले सहकार्य आवश्यक असून आपण प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जनतेला केले आहे. बाहेरून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी होणार आहे. प्रत्येकाला लक्षणे नसल्यास घरीच क्वारंटाईनमध्ये राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि काही लक्षणे असतील तर मात्र संस्थात्मक क्वारंटाईन साठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गडचिरोलीतील अर्थव्यवस्थेची चाकं चार दिवसात सुरू करणार :
प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या तसेच शारीरिक अंतर राखण्याचा अटीवर जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी तीन-चार दिवसात निर्णय घेत आहोत. गडचिरोली शहर तसेच तालुका मुख्यालयातील बाजारपेठांमधील दुकाने सुरू करण्याबाबत चार दिवसात लेखी निर्देश देण्यात येतील असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात आपलेच बाहेर गेलेले नागरिक परतत असून अशा वेळी आपण आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून अजून काही दिवस सहकार्य करावे, आपली अर्थव्यवस्थेची रुतलेली चाके येत्या काही दिवसात निश्चित मार्गी लावू असे आवाहन पालकमंत्र्यांनी जनतेला यावेळी केले.
नागरिकांनी घाबरून न जाता बाहेरून आलेल्यांना सहकार्य करा :
जिल्ह्यात आपलेच लोक परत येत आहेत, प्रत्येक गावातील लोकांनी त्यांना स्वीकारणे गरजेचे आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी प्रशासनाकडून केली जात आहे तसेच त्यांना घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. सदर सर्व प्रवाशांना क्वारंटाईन कालावधीमध्ये 14 दिवस घरातच राहणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे विविध गावांमध्ये अशा आपल्याच नागरिकांना सहकार्य करण्याबाबत प्रशासनाकडून जनतेला विनंती करण्यात आली. जिल्ह्यातील तेंदूपत्ता संकलन सुरू होत आहे. मजुरांसह विविध कंत्राटदारांना यासाठी प्रवास व मजुरांची ने-आण करणे आवश्यक आहे. याबाबत काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. तरी प्रशासनाने याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील मुख्य आर्थिक स्रोत हा तेंदूपत्ता असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या व्यवसायातून होत असते. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन सुव्यवस्थित होईल याकडे प्रशासनाने लक्ष घालावे असे ते यावेळी म्हणाले.
आरोग्यविषयक सुविधांसाठी निधी देणार :
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध आरोग्यविषयक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी गरज पडल्यास निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी जाहीर केले. याबाबत तातडीने प्रस्ताव शासनाकडे सादर करा तो मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर मी प्रयत्न करेन असे ते म्हणाले. सध्या जिल्ह्याला अजून नवीन 5 व्हेंटिलेटर मंजूर आहेत त्यासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून दिला जाईल. तसेच संबंधित 5 व्हेंटिलेटर हे चांगल्या गुणवत्तेचे व उच्च क्षमतेचे असावेत असे त्यांनी यावेळी आरोग्य विभागाला निर्देश दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

