🕒 1 min read
औरंगाबाद : सन २०१९ च्या विधानसभेत निवडून गेलेल्या सर्व २४ महिला आमदार विधिमंडळात मुद्दे मांडण्यासह समाजमाध्यमांतही उपस्थित आहेत. त्यांच्या या उपस्थितीची त्यांच्या मतदारसंघातील स्थिती, समस्या समजून घेण्यासाठी फारशी मदत होत नसल्याचे ‘संपर्क’ संस्थेच्या अभ्यासात दिसून आले आहे. आमदार महिलांच्या फेसबुक पेजिसवर दिनविशेष, जयंती-मयंती या प्रकारच्या पोस्ट्सची संख्या सर्वाधिक, म्हणजे ७१ टक्के तर मतदारसंघातील कामांविषयीच्या मजकूर ४.३१ टक्के इतकाच दिसतो.
सोशल मीडियावरच्या मजकुराचे व्यवस्थापन हा लोकप्रतिनिधींच्या कार्यालयीन कामाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आणि टाळेबंदीच्या काळात तर मतदारसंघांशी संपर्क साधण्याकरिता समाजमाध्यमांचा उपयोग करण्याचे प्रमाण वाढले. धोरणअभ्यास आणि पाठपुरावा करणाऱ्या मुंबईस्थित संपर्क संस्थेने महिला आमदारांकडून संवेदनशील आणि प्रभावी अशा समाजमाध्यमी मंचाचा वापर कशासाठी व कसा केला जातो, याचा अभ्यास नागरिकत्वाच्या भूमिकेतून केला.
रोजगारावर मौन
सन २०२० या कोविडछायेतील वर्षातील सर्व महिला आमदारांच्या फेसबुक पेजेसवर प्रसिद्ध झालेल्या मजकुराच्या नोंदी ठेवत वर्गीकरण व विश्लेषण केले. यात महिला आणि बालकांसंबंधीचा मजकूर २ टक्क्यांहून कमी आणि शिक्षणविषयक मजकूर दीड टक्के आढळला. कोविडकाळात रोजगाराचे आणि स्थलांतरितांचे प्रश्न बिकट झाले होते. मात्र, महिला आमदारांच्या पेजेसवर सर्वात कमी म्हणजे ०.०७२ इतक्या पोस्ट्स रोजगार या विषयाच्या आहेत. त्यांची टक्केवारी ०.०७२ इतकी आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नांवरील पोस्टची संख्या केवळ ०.२२ टक्के आहे. या काळात त्यांनी भरपूर कल्याणकारी कामे केली. त्यासंबंधीचा मजकूर ४.३१ टक्के आहे.
सर्वाधिक पोस्ट
विधानसभेतील कामगिरीविषयक सर्वाधिक मजकूर सुलभा खोडके, त्या खालोखाल प्रतिभा धानोरकर यांचा आहेत. बालकांविषयीच्या पोस्ट्सची सर्वाधिक संख्या यशोमती ठाकूर आणि शिक्षणविषयक सर्वाधिक पोस्ट्सची संख्या वर्षा गायकवाड यांची आहे. त्या त्या विभागाची मंत्रीपदं त्या सांभाळत असल्याने हे उघडच आहे. सरोज अहिरे या विधिमंडळाच्या महिला-बालकल्याण समितीच्या अध्यक्ष असूनही त्यांच्या पेजवर महिला-बालकांसंबंधीचा मजकूर नगण्य दिसतो.
सर्वाधिक फॉलोवर
महिलांविषयीच्या पोस्ट्सची सर्वाधिक संख्या नमिता मुंदडा आणि त्या खालोखाल सीमा हिरे यांची, शेतीविषयक सर्वाधिक पोस्ट्स नमिता मुंदडा, त्या खालोखाल मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या आहेत. १ लाखावर पेज लाइक्स आणि फॉलोअर्स असलेल्या डॉ.भारती लव्हेकर, श्वेता महाले आणि प्रणिती शिंदे या तीन आमदार आहेत. सर्वाधिक ३ लाखांहून अधिक पेज लाइक्स आणि फॉलोअर्स डॉ.भारती लव्हेकर, वर्सोवा मतदारसंघ यांना आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! पोलिसाच्या अत्याचारामुळे पत्नीची आत्महत्या, पतीनेही घेतला गळफास
- ‘घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ’, दरेकरांची अर्थसंकल्पावरून टीका
- अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- उस्मानाबाद मेडिकल कॉलेज; घोषणा केली भाजपने, पूर्ण केली राष्ट्रवादीने!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

