मुंबई : शुक्रवारी सकाळपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत मंत्रालयातील १००पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी उलट्या आणि जुलाबाच्या त्रास जाणवू लागला होता. मंत्रालयातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ही मंडळी दाखल झाली होती. उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने अधिकारी कार्यालय सोडून घरी निघून गेल्याने एकच खळबळ उडाली होती.
मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, जलवाहिन्यांची तपासणी करण्याचेही मुख्य सचिवांचे निर्देश दिले होते.
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या एका टाकीमधील पाण्यात अतिरिक्त क्लोरिन झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर २२ जून रोजी पिण्याच्या पाण्याचे नमुने व तपासणी अहवाल प्राप्त झाला असून आज रोजी पाणी पिण्यायोग्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे दिली.
यावेळी पाटील म्हणाले, १९ जून रोजी प्रथम एका पाण्याच्या टाकीत अतिरिक्त क्लोरिन निदर्शनात आले. त्याचा प्रादुर्भाव २१ जून रोजी कमी झाला. २२ जून रोजी पाण्याचे नमुने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तपासणी अहवाल प्राप्त झाला असून आज मंत्रालयातील पाणी पिण्यायोग्य आहे असे त्यांनी म्हटले आहे.