मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’, अशा शब्दात ट्वीट करत संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये.
का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे.
समझने वालों को इशारा काफी है!— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2020
पण संजय राऊत यांनी निर्लज्ज असा उल्लेख केलेले राज्यपाल रामलाल नक्की कोण होते ? निर्लज्ज म्हणण्याइतपत त्यांनी काय केलं होत ? असे अनेक प्रश्न रामलाल यांना ओळखत नसणाऱ्यांना पडणे साहजिक आहे. संजय राऊत यांनी निर्लज्ज म्हंटलेले राज्यपाल म्हणजे ‘रामलाल ठाकूर’.
रामलाल ठाकूर हे हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे नेते होते. 28 जानेवारी 1977 रोजी ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. ते दोनदा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 1957, 1962, 67, 77, 80 आणि 1982 या विधानसभा निवडणुकांत ते जिंकले. झुबल कोटखाई हा त्यांचा परंपरागत मतदारसंघ. मग इतका धुरंदर नेता निर्लज्ज कसा हे कोड आहे.
पण राजकारणी नाही तर राज्यपाल म्हणून संजय राऊत यांनी रामलाल यांचा निर्लज्ज असा उल्लेख केला आहे. ते 15 ऑगस्ट 1983 ते 29 ऑगस्ट 1984 या काळात आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. ही त्यांची सर्वाधिक वादग्रस्त कारकीर्द म्हणून पहिली जाते.
रामलाल आंध्रप्रदेशचे राज्यपाल असताना, तिथले मुख्यमंत्री एनटी रामाराव अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी गेलेले असताना त्यांनी रामा राव यांच्याच मंत्रिमंडळातील अर्थमंत्री एन भास्करराव यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करुन त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली होती. खरं तर अर्थमंत्री एन भास्करराव यांना त्यावेळच्या 20 टक्के तेलुगु देसम आमदारांचाही पाठिंबा नव्हता.
आठवड्याभरानंतर अमेरिकेतील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यावर एनटी रामाराव हैदराबादला परतल्यावरही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री मानण्यास राज्यपालांनी नकार दिला होता. ग एनटी रामाराव यांनी काँग्रेस आणि राज्यपाल रामपाल यांच्याविरोधात राज्यव्यापी निषेध आंदोलन छेडलं. आंदोलनाच्या तब्बल एक महिन्यानंतर राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांनी आंध्रचे राज्यपाल ठाकूर रामलाल यांना बडतर्फ केलं. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा एकदा एनटी रामाराव यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पूर्ण झाला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

