🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ‘आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत’, असे म्हटले. तर यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
‘आम्ही खंबीरपणे संजय राऊत यांच्या पाठिशी आहोत’ इति रोहित पवार. तसे तुम्ही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे होतात. जे काही होईल ते कायद्यानेच होईल. तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे रहा अथवा उभे राहू नका, काही फरक पडणार नाही. असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
देशात ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथे ईडी ,सीबीआय ,आयटी लावून विरोधकांच्या चौकशा करुन त्यांना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने हा प्रयत्न केला. महाराष्ट्रात तर सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, मात्र त्यांना यश येत नाही. कुणी नेता चुकला म्हणून ही कारवाई होत नाही तर चौकशी यंत्रणांच्या माध्यमातून एखाद्याला बदनाम करण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.
दरम्यान पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. त्यातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप असून त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने या जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
