टीम महाराष्ट्र देशा : शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.
विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध येणे अशी लक्षणे दिसून येतात. इंगळीच्या विषाने याहून गंभीर परिणाम होऊन मृत्यूही होऊ शकतो. हाताला किंवा पायाला विंचू चावल्यास त्याच्या वरच्या बाजूस पट्टी बांधावी. गरज असल्यास चावलेल्या जागी छेद घ्यावा. जखम पाण्याने, अमोनिया किंवा पोटॅशियम परमँगनेटने धुवावी.
बधीर करण्यासाठी औषध उपलब्ध असल्यास ते टाकावे. चावलेल्या भागाची हालचाल शक्यतो करू नये. त्यामुळे वीज कमी शोषले जाते. लक्षणांमध्ये वाढ होत गेल्यास तसेच इंगळीने म्हणजे लाल मोठ्या विंचवाने दंश केल्यास लहान मुलांना विंचू चावल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरवण्यासाठी जी चिंच असते व त्या चिंचेमधील जो बी असतो त्याला चिंचुके म्हणतात. या चिंचुकेचे वरील जे टरफल (आवरण) ते काढून टाकायचे आणि ते काढल्यानंतर जो पांढरा भाग आपल्याला दिसतो, तो दगडावरती चांगल्या प्रकारे घासून ज्या ठिकाणी विंचू चावला आहे. त्या ठिकाणी हा घासलेला पांढरा भाग धरून ठेवायचा. आणि जोपर्यंत आपल्याला थोडे बरे वाटत नाही तोपर्यंत तो चिचुका तसाच धरून ठेवायचा.
तसेच विष उतरवण्यासाठी तुरटी देखील वापरू शकता. तुरटीचा खडा घेऊन ती गॅसवरती किंवा मेणबत्तीवरती धरून ठेवायचा जेणे करून तुरटी पाघळू लागेल. आणि तुरटी वितळू लागली की ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी ही तुरटी धरून ठेवायची आणि ही तुरटी त्या भागाला चिटकून बसेल, नंतर जो पर्यंत त्या विंचवाचे विष निघून जात नाही, तोपर्यंत ही तुरटी तशीच धरून ठेवायची. ज्यावेळी सर्व विष उतरून जाईल त्यावेळी आपोआप तुरटी खाली पडणार.


