उस्मानाबाद : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूची लोकांना धास्ती वाटू लागली आहे. याचा परिणाम सार्वजनिक कार्यक्रमांवर होत असून जोतीबाचीवाडी येथील अनेक वर्षापासून पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू असलेला सप्ताह,जोतीबा यात्रा कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.याशिवाय ग्रामीण भागातील शेतीसह विविध छोट्या-मोठे उद्योगच ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वच ठिकाणी गर्दीला बंदी घालण्यात आली आहे. परिणामी आठवडे बाजारासह सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या गेल्याने ठिकठिकाणची नागरिकांची गर्दी ओसरत आहे. या सर्वाचा फटका शेतीसह छोट्या-मोठ्या उद्योगांना बसत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, कडधान्ये, दुध आदी माल बाजारपेठत जात नसल्याचे शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीतच सापडलेला आहे.
शेतकर्याला कोरोनाचा फटका बसू लागला आहे. भाजीपाला, धान्ये, कडधान्यांचा उठावच होत नसल्याने त्याचा त्रास शेतकरीवर्गाला सहन करावा लागत आहे. तसेच यामध्ये व्यापारीवर्गही चिंतेतच आहे. परिणामी शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास माल कुजण्याची भीती व्यक्त करत कमी दराने आपला माल व्यापारीवर्गाला शेतकरी देत असल्याचे चित्र आहे. तसेच मार्च ते मे महिन्यादरम्यान लग्न समारंभ, वास्तूशांती आदी कार्यक्रमांचे आयोजन असते. अशा कार्यक्रमांचा खर्च हा सर्वसामान्य शेतकरी आपल्या शेतीमाल खरेदी करुनच करत असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे नियोजित कार्यक्रमांमध्ये खर्च कसा करावयाचा? असाही प्रश्न सर्वसामान्य कुटुंबधारकाला पडत असून अशी मंडळी चिंतेतच दिसत आहेत.
कोरोनामुळे ग्रामीण भागातील समान्य जनतेवरही परिणाम होत आहे एकंदरीत कोरानामुळे सर्व व्यवहार ठप्प होत असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. परिणामी सर्वत्र मंदीचेच वातावरण जाणवू लागले आहे.


