टीम महाराष्ट्र देशा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित ‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजना’ सन २०१८-१९ या वर्षासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी विम्याचा लाभ द्यावा. असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
अकोला जिल्ह्यातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे पार पडली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली तर पटोले यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पटोले म्हणाले, पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती निर्माण करावयाची गरज असून, संबंधित विभागाने त्यासंदर्भात कारवाई करावी. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८ अंबिया व मृगबहाराची नुकसान भरपाई जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यात यावी. तसेच जे शेतकरी पाहणी न झाल्याने आणि कमी तापमान या निकषावर नुकसान भरपाईपासून वंचित राहिले अशा शेतकऱ्यांनाही न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीने पीक विम्याची भरपाई द्यावी, असे निर्देश पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी भविष्यात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीस विस्तार व प्रशिक्षण मंडळाचे संचालक एन.टी.शिदोळे, मुख्य सांख्यिकी उदय देशमुख, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अशोक मानकर, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

