औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना राबविण्यात वैजापूर कृषी उपविभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सिल्लोड व हिंगोली कृषी उपविभागाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.
राज्यातील मराठवाडा व विदर्भ हे विभाग कायम दुष्काळ व अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जातात. सध्या वेगाने होणाऱ्या हवामान बदलामुळे या भागातील शेती अधिक जोखीम व नुकसानीची ठरली आहे. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, दरडोई घटत जाणारी जमीन धारणा, जमीनीतील सेंद्रिय कर्बाचे घटते प्रमाण हेही या भागाच्या अडचणीत आणखी भर घालतात. याचा परिणाम म्हणून मराठवाडा व विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. वेगाने होणारे हवामानातील बदल आपण थांबवू शकत नाही.
परंतू बदलांशी शेती पद्धती जुळवून घेणे व अनुकुल करणे एवढेच आपल्या हातात आहे. यासाठी राज्य सरकारने २०१८-२०१९ पासून जागतीक बँकेच्या अर्थ सहाय्याने मराठवाडा व विदर्भातील १५ जिल्ह्यातील ५ हजार १२० गावातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरडवाहू शेती करणाऱ्या अल्प अत्यल्प भुधारक शेतक-यांना विविध घटकांचा लाभ अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतीशाळा, सामुहिक शेततळी, शेततळे अस्तरीकरण, ठिंबक व तुषार सिंचन, बांबू लागवड, मृदू व जल संधारणासाठी पाणलोट व्यवस्थापन, मत्स्य पालन, शेळी पालन, शेतमालावर प्रक्रिया करणे तसेच शेतमालाची साठवणूक व वाहतूक करणे यासह अन्य बाबी देखील शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांसाठी प्रकल्पातून देण्यात येतात.
वैजापूर कृषी उपविभाग अंतर्गत वैजापूर, गंगापूर व खुलताबाद हे तिन तालुके येतात. उपविभागातील १३५ गावांची निवड पोकरा प्रकल्पासाठी झाली आहे. या गावातील १७ हजार ४२२ लाभाथ्र्यांना विविध घटकांचा ९३ कोटी ४३ लाख एवढ्या अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने सामुहीक शेततळे (२०७), वैयक्तिक शेततळे खोदकाम (४२२), शेततळे अस्तरीकरण (५०८), ठिंबक सिंचन संच (५६८१), तुषार सिंचन संच (५०१४), इलेक्टीक/डिझेल पंप (२८१२), पाईप लाईन (११३१), शेडनेट गृह व पॉली हाऊस (१६१), फळबाग लागवड (१०९३), तुती लागवड व रेशीम किटक संगोपन (१५४), शेततळ्यातील मत्स्य पालन (८३), शेळीपालन (७६) आदी घटकांचा लाभ देण्यात आला आहे.
शेततळ्यामुळे संरक्षीत सिंचनाची सोय झाली आहे. ठिंबक व तुषार सिंचनाचा वापर वाढल्याने दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. बहु वार्षिक फळबागा व भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शेडनेटगह घटकांचा लाभ घेऊन कमी क्षेत्रात व कालावधीत अधिक उत्पादन मिळू लागले आहे. कृषी उपविभागात ८१ शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांना औजार बँका, स्वच्छता व प्रतवारी केंद्र, दाळ मिल, दुध शितकरणगृह, मुरघास युनीट आदी बाबींचा लाभ देण्यात आला आहे.


