टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सार जग आपल्या पाठीशी आहे आणि आता हीच वेळ आहे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवण्याची अशा तीव्र शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर आता प्रचार, निवडणुका सोडा आधी त्यांना उत्तर द्या, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला सुनावलं आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की , गुप्तचर विभाकडून माहिती मिळूनही आपण त्याकडे लक्ष देत नसू तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांच्या हातात सूत्र आहेत. ती लोकं करतात काय? त्यांना त्यांच्या जागेचं महत्व कळत नसेल तर त्यांना आता जागे वरून हटवले पाहिजे.दरवेळी आपण केवळ घोषणा, दंड थोपटून दाखवतो, पण कधी,… पाच वर्ष होऊन गेली. कारण शांत बसणे म्हणजे मर्दानगी नाही, असेही ते म्हणाले.
याआधी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा अभिमान नक्कीच आहे. मात्र आपण तो पाकव्याप्त कश्मीर म्हणजे खरंतर आपल्याच भूभागात केला होता. पण ते लोक आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात संताप आहे. सगळी जनता सरकारच्या पाठिशी आहे. जगभरातून आपल्याला पाठिंबा मिळतो आहे. तेव्हा आता प्रचार, निवडणुका सोडा आधी त्यांना उत्तर द्या, असंही उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
दरम्यान गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले असून २० जवान जखमी झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.आता भारतात पुलवामा येथील झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. संबंध भारत वासियांकडून ४२ जवानांच्या या बलिदानाचा बदला घेण्याची मागणी होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

