पुणे : बिबवेवाडी परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घुण पद्धतीने हत्या केल्याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने वार करत तिचा खून केला. सध्या या धक्कादायक घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट देत सर्व माहिती घेतली. १२ तासांच्या आत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. आरोपी तरुण हा अल्पवयीन मुलीचा नातेवाईक असून तिच्या घरी राहत होता. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेवर आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना मन हेलावून टाकणारी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे अतिशय निंदनीय व सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तिला भावपूर्ण श्रद्धांजली. असं भोसले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईटचे लाँचिंग
- ‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पुण्यातील कब्बडीपटू मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी
- ‘अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार’, किरीट सोमय्यांचा दावा


