मुंबई : “दक्षिण मुंबईत प्रचंड मोठी घरं आहेत. मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये 2 बेडरुम हॉल किचन किंवा 1 बेडरुम हॉल किचन आहे. मात्र, ज्याचं किचन म्हणजेच घर आहे त्या माणसांची बाजू मी सक्षमपणाने मांडतोय. आपल्याला घरी बसा असे सांगण सोपं वाटतं पण त्याच्यापेक्षा ते काय करतात, रस्त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर येऊन बसतात. याचा अर्थ त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही असं नाही. घरात बसणार तरी कसं? बसायला गेले तर माणसांना जागाच नाही. या वास्तवाकडेही लक्ष दिलं पाहिजे”, असे मत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, तरीही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. मात्र याच लोकांच्या खऱ्या परिस्थितीकडे त्यांनी राज्याचे लक्ष वेधले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कळवा पूर्व भागातील सामाजिक वास्तवही पाहता तेथील लोक अत्यंत छोट्या घरांमध्ये राहतात. एका 10 बाय 10 च्या खोलीत एक पलंग, कपाट, एक छोटसं किचन, पाणी ठेवायची जागा आहे. त्यामध्ये जागा उरते ती फक्त 6 बाय 6 फुटाची. या जागेतील घरातील लोकांची संख्या कमीतकमी 5 आणि जास्तीत जास्त 12 ते 15 अशी आहे. फक्त जेवणापुरता त्या घराचा वापर होतो. एरव्ही कुठला माणूस कुठे झोपतो हे माहित नसतं. मग यामध्ये किती लोकं बसू शकतील? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
तसेच, “सामाजिक जाणीव नसलेली लोकं गरिबांना दोष देत आहेत. मात्र हा दोष रेशन कार्डवाल्यांचा नसून पासपोर्टवाल्यांचा होता. हा भारतात उत्पादित झालेला रोग नाही, बाहेरुन आलेला रोग आहे. कोण कुठे गेलं होतं त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. मात्र आता तुम्हाला दक्षिण मुंबईत गर्दी दिसणार नाही. कारण सगळे फार्महाऊसवर निघून गेले आहेत. मात्र गरिबांना घरात बसायला जागा नाही. त्यामुळे ते रस्त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर येऊन बसतात. दिवसेंदिवस रुग्ण वाढल्याची माहिती समोर आली तशी गर्दी कमी झाली. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती वाटते. आता लोकंही गंभीर झाले आहेत”, असं आव्हाड म्हणाले.
“श्रीमंतांच्या वस्त्यांमध्ये खूप आराम आहे. पण गरिब दिवसाला शंभर रुपये कमवत होता. उद्याचे शंभर रुपये कुठून आणायचे? हा प्रश्न उभा राहिलेला आहे. चार-पाच दिवसांमध्ये कमवलेले सगळे पैसे संपलेले आहेत. उद्या जेवणाचं काय होणार? या भीतीपोटी तो गांगरुन गेला आहे. मी असे अनेक घरं बघतोय जे एकवेळ जेवत आहेत. हे वास्तव समोर यायला हवं ज्यामुळे जे रेशन मोदी फुकटात देणार आहेत ते लवकर यायला मदत होईल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.


