वर्धा : कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांकडून दररोज 10 लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याची घोषणा केली. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील”, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल (31 मार्च) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दुग्धविकास मंत्री सुनील केदार आज वर्धा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी वर्ध्यात शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे पूर्ण दूध संकलित केले जाईल. दुधाचा एकही थेंब शिल्लक ठेवणार नाही. शेतकऱ्यांचा दुधाचा व्यवसाय विस्कळीत झाला आहे. हा व्यवसाय सुरळीत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून शिल्लक दुधाचे दूध पावडर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकरी आणि शेतमजूर तसेच विस्थापित मजुरांना प्राधान्य देऊन कुणीही उपाशी राहणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे”, असं सुनील केदार यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. सध्याच्या परिस्थितीत अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला धान्य पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. या कठीण प्रसंगात शेतकरीही अडचणीत सापडला आहे. धान्य पिकवणारा एकही शेतकरी, शेतमजूर उपाशी राहणार नाही, याची जबाबदारी सरकार घेत आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना धान्य दिलं जाणार आहे. मात्र, इतर जिल्ह्यातील अडकलेल्या कामगारांकडे रेशन कार्ड नाही. या सर्वांना 2014 च्या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत धान्य दिल जावं, अशी मागणी वर्ध्यातील सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

