मुंबई : कोरोनामुळे सर्वच सांप्रदायिक कार्यक्रम रद्द करा व घरी बसूनचं चिंतन मनन करा असा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र आता राज्य सरकारने आषाढी वारीच्या नियोजनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून होत आहे. याबाबतचं आज संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा निघण्याबाबत मानकरी, विश्वस्त आणि इतर महत्वाच्या 9 जणांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली.
या बैठकीत पालखी सोहळ्याची परंपरा न मोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शासनाने सुचवलेल्या पद्धतीने पालखी सोहळ्याचं स्वरूप ठेवण्यावर एकमत झालं आहे. दरवर्षी महाराष्ट्राभरातून साधारणपणे 15 लाख वारकरी मजलदरमजल करत पंढरपूरमध्ये पोहोचतात. पण यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव पाहता पालखी सोहळ्याला इतकं भव्य दिव्य स्वरुप असू शकत नाही.
तसेच यंदा कोरोनाचे जीवघेणे संकट असल्याने पालखीच्या नियोजनाबाबत शासनाने यावर स्पष्टता द्यावी अशी मागणी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी केली होती.
तर देहूचे पालखी सोहळा उत्सव प्रमुख अभिजीत मोरे हे म्हणाले की, दरवर्षी प्रस्थान सोहळ्यात देहूमधून 330 दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. पण यावर्षीच्या संकटांची सगळ्यांना कल्पना आहे. आमच्याकडे काही दिंड्या कर कर्नाटकमधूनही येतात. अशा दिंडी प्रमुखांचे आम्हाला सातत्याने फोन येत आहेत. त्यांच्यकडून सात्यत्याने विचारणा होते आहे की आम्ही काय करायचं. पण आता शासनाच्या निर्णयावर सगळं अवलंबून आहे.
दरम्यान संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक वारकरी सहभाग घेत असतात. तर या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान करतात. मात्र पुण्यातचं कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने हा पालखी सोहळा कसा पार पडणार यावर आता शंका निर्माण केली जात आहे. या दोन्ही पालख्या पुण्यात जिथे मुक्कामी असतात. तिथेच कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. त्यामुळे पालखीचं स्वरुप कसं असावं यावर विचार होणं गरजेचं असल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
