अहमदनगर : 3 मे पर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन संपेल व वाहतुकीची साधने उपलब्ध होऊन आपला शेतीमाल बाजार विकण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना लॉकडाऊन चा कालावधी 17 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने धक्का बसला आहे. तरी देखील केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या वर्गवारीमध्ये अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये असल्याने आता या वाढीव लॉकडाऊनच्या काळात काही विशेष सवलती मिळण्याची अपेक्षा नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
मे महिना सुरू झालेला असल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतांमध्ये काढणी करून साठविलेला कांदा खराब होण्याच्या भितीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.त्यामुळेच लॉकडाऊन 3 मध्ये तरी वाहतुकीला परवानगी मिळून कांदा बाजारात नेणे शक्य होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.नगर जिल्ह्यामध्ये गेली काही वर्षे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करीत आहेत.
काही प्रमाणात शेतकऱ्यांना कांद्याला बरा भाव मिळत असल्याने समाधानाचे वातावरण आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 24 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला असून आता तर हा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाला सुरूवात होते. काही दिवसांपूर्वीच उन्हाळी कांदा पूर्णपणे तयार झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा पिकाची काढणी करून शेतांमध्येच झाकून ठेवून त्याची साठवणूक केली आहे. 3 मे रोजी लॉकडाऊन संपेल व आपल्याकडे साठविलेला कांदा विकण्यास परवानगी मिळेल,अशी अपेक्षा होतकी.मात्र लॉकडाऊन वाढल्याने आता या तिसर्या टप्प्यात तरी थोडी सवलत मिळण्याची व त्यामुळे कांदा खराब होण्यापूर्वी पैसे हाती येतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

