औरंगाबाद : ऐतिहासिक बिबी-का-मकबऱ्यासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सुमारे अडीच एकर जागेवरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी (दि. २९) जमीनदोस्त केले. या जागेवर दोन शाळा सुरू होत्या तसेच टपऱ्या, सिमेंटचे खांब लावून जागेचा ताबा घेण्यात आला होता. ही जागा मोकळी करून जागेचा ताबा पुरातत्त्व विभागाला देण्यात आला. यावेळी महापालिकेच्या कारवाईला विरोध करत एका महिलेने जेसीबी अडवून धरला मात्र पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली.
ऐतिहासिक बिबि-का-मकबरा परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. अनेक जण ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करतात. बिबी-का-मकबरा पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक येतात. या अतिक्रमणांमुळे मकबरा परिसराचे विद्रूपीकरण झाले होते. स्मार्ट सिटी अभियानाच्या माध्यमातून मकबरा परिसर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ. मिलिंदकमार चवले यांनी महापालिकेला पत्र दिले होते. त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.
दरम्यान महापालिकेने जयराज पांडे यांना नोटीस बजावली होती. महापालिकेने बजावलेली नोटीस व पुरातत्त्व विभागाच्या विरोधात पांडेय यांनी न्यायालयात धाव घेतली. या अर्जावर सुनावण्या झाल्या पण पांडेय यांना न्यायालयाने दिलासा दिला नाही. याबाबत महापालिकेच्या पॅनेलवरील वकील दीपक पडोळे यांनी माहिती कळविताच अतिक्रमण हटाव विभागाने मंगळवारी कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखालील पथक सकाळी ११ वाजता कारवाईसाठी पोचले असता, कारवाईला विरोध करण्यात आला.
एका महिलेने जेसीबीसमोर येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी तैनात असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागातील पोलिस कर्मचारी व बेगमुरा पोलिसांनी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सुमारे अडीच तासात संपूर्ण अडीच एकर जागा महापालिकेने मोकळी केली व ती पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली. पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशिद यांच्या पथकाने केली.
महत्त्वाच्या बातम्या
- यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर झाल्यानंतर मूर्तिकार का झाले आहेत नाराज ?
- पीकविमा देण्यास टाळाटाळ; विमा कंपनीसह केंद्र, राज्य सरकारला खंडपीठाची नोटीस
- ‘पंजा’ फक्त ‘टायगर’ जवळच असतो आणि टायगर काँग्रेसमय झालाय- नाना पटोले
- मित्राच्या वाढदिवसाला डीजेच्या तालावर डान्स; ९ जणांवर गुन्हा
- विदर्भासाठी ‘हा’ प्रकल्प ठरणार वरदान; फडणवीसांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट


