अकोला : केंद्र सरकारने नाशिक परिसरात नाफेडद्वारे कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातही सुमारे सहा हजार एक्करवर कांदा उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे नाशिकच्या धर्तीवर अकोल्यातही केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडून होत आहे.
आतापर्यंत दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिट, कीड, तण इत्यादी कारणांनी शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानाला ‘मानवांमध्ये पसरलेला कोरोना विषाणू’ कारणीभूत ठरला आहे. अचानक उद्भवलेले कोरोनाचे संकट जगभरात सध्या थैमान घालत असून, भारतातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. हा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आले. याचा परिणाम वाहतूक व प्रामुख्याने शेती व्यवसायावर झाला.
शेतमाल काढणीपासून ते विक्रीपर्यंत अडचणी निर्माण झाल्याने, शेतमाल शेतातच खराब होत आहे. अकोला जिल्ह्यातही फुलशेती, भाजीपाला पिके, फळपिके, गहू, कापूस, हरभरा, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही कांदा उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात सुमारे 6000 एक्करवर यंदा कांदा उत्पादन घेण्यात आले असून, हे सर्व कांदा उत्पादन शेतातच खराब होत आहे. नाशिक परिसरात मात्र कांदा उत्पादकांना दिलासा देत, केंद्र सरकारने नाफेडद्वारे कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर अकोला जिल्ह्यातही केंद्र सरकारने नाफेडद्वारे कांदा खरेदी करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडून होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

