🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द समाजमाध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टिका करणारे तसेच धमकी देणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. तसेच पोलिसांवरील भ्याड हल्ले रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कोव्हीड-१९ योध्दांवर हल्ला झाल्यास त्यांच्याविरुध्द अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मान्यता दिली आहे. या कायद्याचा वापर करून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा व पोलीस दलाचे मनोबल वाढवावे अशी मागणी आज भाजपाच्या शिष्टमंडळाच्यावतीने मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडे आज करण्यात आली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
भाजपच्या वतीने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार राज्यात पोलीस निरीक्षक श्री. पैठणकर यांच्या युनिटवर तीस जणांच्या गटाने केलेला हल्ला, डोंगरी येथील पोलीस हल्ला अशा अनेक घटना घडल्या असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ही बाब पोलीस दलाचे मानसिक खच्चीकरण करणारी आहे. राज्यात आतापर्यंत तीन पोलिस शिपायांनी कोव्हीड-१९ विरुद्धच्या युध्दात स्वतःचा जीव गमवला आहे.पोलीस बांधव आपली जबाबदारी पार पाडत असताना पोलिसांवरील होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे,हे चिंताजनक असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे राज्यात ठिकठिकाणी नागरीक अडकून पडले आहेत, त्यांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाची परवानगी आवश्यक असून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे, मात्र अनेक अर्ज प्रलंबित आहेत, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आल्याचे दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यातील लॉकडाऊनमुळे सामाजिक अंतराचे पालन न होता अनावश्यक कारणांसाठी गर्दी केली जात आहे.यामध्ये बांद्रा येथील गर्दी,कुर्ला येथे फॉर्म वाटताना झालेली गर्दी,बोरीवली म्युनिसिपल मार्केट येथील गर्दी, विविध भाजी मंडई येथील गर्दी आदी गर्दीची ठिकाणे भाजपने सादर केलेल्या पत्राच्या माध्यमातून आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. काही ठिकाणी पोलिस इंटेलिजन्सची कमतरता व काही ठिकाणी महापालिका व पोलीस यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे या घटना घडत आहेत असे सांगतानाच दरेकर यांनी शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून, या प्रश्नांवर मात करण्याची गरज आहे. विविध शासकीय विभागात समन्वय वाढवण्याची आवश्यकता आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरीकांना स्वगृही जाण्यासाठी प्रवासाची परवानगी शासनाने नुकतीच दिली आहे, तसेच केंद्रिय गृह मंत्रालयानेही मजुरांच्या प्रवासासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी उद्भवू शकते… ही बाब लक्षात घेऊन त्याचेही नियोजन करावे, जेणेकरुन बांद्रासारखी परिस्थिती उद्भवणार नाही. यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशी मागणीही भाजपच्यावतीने करण्यात आल्याचे दरेकर यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

