माजलगाव: सोळंके साखर कारखाना सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासत आला असून, या हंगामातही मराठवाड्यात उसाला सर्वाधिक भाव देणार असल्याचे या कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
सोळंके कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. सोळंके म्हणाले की, मागील वर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. सोळंके साखर कारखाना आजपर्यंत एकही हंगाम बंद न ठेवता अविरतपणे सुरू आहे. या हंगामात उसाला मराठवाड्यात सर्वाधिक उच्चांकी भाव देणार आहे. पावसामुळे माजलगाव धरण व इतर जलसाठेही शंभर टक्के भरले आहेत.
त्यामुळे आगामी काळात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या गळीत हंगामात कारखान्याचे साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार सोळंके यांनी केले आहे.
यावेळी ज्येष्ठ संचालक धैर्यशील सोळंके प्रास्ताविकात म्हणाले की, इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची क्षमता दुपटीने वाढविण्यात येणार आहे. विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न आहे. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

