नांदेड : देशातील अग्रगण्य स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय कार्यालय नांदेड येथे मंजूर झाले असून १ जूनपासून हे कार्यालय कार्यान्वित होणार आहे. नांदेडला विभागीय कार्यालय मंजूर करून घेण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बॅंक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ.शंकरराव चव्हाण यांनी देशाचे अर्थमंत्री असताना १९८८ मध्ये नांदेड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय मंजूर करून घेतले होते. त्यानंतर आता त्यांचेच सुपुत्र व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे विभागीय कार्यालय आणले आहे.
एसबीआयचे विभागीय कार्यालय नांदेडला आल्याने आता २ कोटींहून अधिक कर्जाच्या मंजुरीचे निर्णय नांदेडमध्येच घेतले जाणार आहे. प्रशासकीय दृष्टीकोनातून ही बाब उपयुक्त ठरणार आहे. बँकेचे वाढलेले कार्य व ग्राहक सेवेचा विचार करता नांदेड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी ना. चव्हाण यांनी बँक व्यवस्थापनाकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! अपहृत मुलीच्या शोधासाठी बीडच्या पोलीस अधिकाऱ्याकडून ४० हजारांची मागणी
- मोबाईल ॲप डाऊनलोड करायला लावून २५ हजारांचा गंडा
- पीक विमा मिळत नसल्याने महिला शेतकरी करणार आंदोलन
- ‘गायकवाड अहवाल हा उद्धव ठाकरेंना समजलाच नाही’, संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका
- दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र


