इंदापूर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज गेली दीड महिना अनेक उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशी सर्व विदारक परिस्थिती असताना राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी एखाद आर्थिक पॅॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
इंदापूर येथे भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनांतर्गत राज्य सरकारच्या विरोधात विविध मागण्यांचे निवेदन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना सुपूर्द केले, त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, करोना संकट हाताळताना सरकारमध्ये आदेश देताना सुसूत्रता दिसून येत नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यामध्ये अपयशी ठरले असून, आरोग्य व्यवस्था कोलमडलेली दिसून येत आहे. राज्यातील डॉक्टरांना पीपीई किट व इतर साहित्य वेळेवर मिळू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये करोनाचा संसर्ग हा दोन महिने झाले तरी कमी न होता, दिवसेंदिवस वाढतच आहे. याविरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपतर्फे मंगळवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील हजारो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे, यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. राज्यातील पोलिसांची अवस्था विदारक आहे, त्यांना काही प्रमाणात शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज आहे. त्यांना इतर सुविधा पुरवणे आवश्यक आहे, असही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

