🕒 1 min read
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देश 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 35 हजाराच्या पुढे गेली आहे. तर, आतापर्यंत अकराशेहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती पाहता आणखी काही दिवस लॉकडाऊन करणे आवश्यक होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी चर्चा झाली. त्यानंतर देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत.
दुसरीकडे अमेरिकेत कोरोना साथीमुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असल्यामुळे बेकारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून आणखी समस्या निर्माण होऊ नये याकरिता त्या देशातील एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांनी सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेतील प्रत्येक राज्यात कोरोना फैलावाची स्थिती निरनिराळी आहे. त्यानुसार या राज्यांतील प्रशासन रेस्टॉरंट, किरकोळ व्यापार व अन्य उद्योग-धंद्यांवरील निर्बंध किती प्रमाणात शिथिल करावेत याचा निर्णय घेणार आहे. कोरोना साथीच्या तडाख्यामुळे अमेरिकेमध्ये सुमारे ३ कोटी लोकांनी बेकारी भत्ता मिळावा म्हणून आपल्या नावाची नोंदणी सरकार दरबारी केली आहे. हे बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेच हे निदर्शक आहे. ही समस्या अधिक उग्र होऊ नये म्हणून निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत होती. अमेरिकेतील एकूण कामगारांपैकी १८.४ टक्के लोक सध्या बेकार झाले असावेत, असा एक अंदाज आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. त्यासाठी अमेरिकेतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली होती. हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे ला संपणार होता. मात्र, पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 मे पासून 17 मे पर्यंत राहणार आहे.


