🕒 1 min read
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील श्रेया सजन या चिमुरडीच्या हस्ताक्षराच्या प्रेमात अनेक मंत्री पडले आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी श्रेयाच्या हस्ताक्षराची तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी श्रेयाच्या नावाने अभिनंदनाचे पत्रच लिहिले होते. तुझे हस्ताक्षर पाहून खूपच आनंद झाला. या धावपळीच्या जगात सुंदर हस्ताक्षर म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे. हे हस्ताक्षर असेच जप. तुझ्या शैक्षणिक कारकीर्दीस शुभेच्छा. आणि पत्राचा शेवट करताना त्यांनी बालमानस जपत, कोणतीही औपचारिकता न ठेवता, प्रोटोकॉल बाजूला सारून तुझाच जयंत काका असे आपुलकीचे शब्द लिहिले होते.
आता त्या पत्राला श्रेयाने उत्तर दिल आहे. तेही आपल्या मोत्यापेक्षा सरस हस्ताक्षरात. ‘काका तुम्ही खूप कामात व्यस्त असताना मला पत्र लिहिले याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही केलेल्या कौतुकामुळे मला यापुढे सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझी कला आणखी वाढवणार आहे. काका मी मोठी झाल्यावर माझ्या आई बाबांबरोबर मुंबईला तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. तुम्ही मला भेटाल अशी अपेक्षा बाळगते’. अस पत्र श्रेया सजन हिने लिहले आहे.
श्रेयाचे पत्र

या पत्राला जयंत पाटील यांनी ट्विट करत उत्तर दिल आहे. श्रेया,तुझे पत्र मिळाले. तू मोठी झाल्यावर आपण भेटूच. त्याआधी देखील तुला भेटायला आवडेल मला. तुझ्या भावी आयुष्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद. अस उत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे.
श्रेया,
तुझे पत्र मिळाले. तू मोठी झाल्यावर आपण भेटूच. त्याआधी देखील तुला भेटायला आवडेल मला. तुझ्या भावी आयुष्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद. pic.twitter.com/qshiMrdRnH— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 1, 2020
श्रेया आहे कुठली ?
श्रेया ही राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कडू वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. ती इयत्ता तिसरीत शिकते. तिच्या हस्ताक्षराबाबतचा व्हिडिओ तिचे वडील गोरक्षनाथ सजन यांनी व्हायरल केला होता. जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही विद्यार्थिनी असल्याचे त्यांनी त्यावर कॅप्शन लिहिले होते. मोबाईलवरील की बोर्डाच्या प्रेमात पडलेल्या सोशल मीडियातील लोकांना हे पटलं नाही. म्हणून श्रेयाच्या वडिलांनी पुन्हा ती लिहित असताना व्हिडिओ शेअर केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

