मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाने आपल्यावर डॉक्टरकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. या रुग्णाने पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील नोंदवला आहे. तर सध्या सबंधित रुग्णालयाने आरोपी डॉक्टरला निलंबित केले आहे.
मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयात हा प्रकार घडला असून ३४ वर्षांच्या डॉक्टरवर एका ४४ वर्षाच्या करोनाग्रस्त पुरुष रुग्णाने हा आरोप केलाय. आरोपी डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.
मात्र, आरोपी डॉक्टरही करोनाग्रस्त असल्याच्या संशयामुळे पोलिसांनी अद्याप डॉक्टरला अटक केलेली नाही. त्या डॉक्टरला ठाणे येथील त्याच्या राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एक मे रोजी १० व्या मजल्यावरील आयसीयूमधील रुग्णाच्या रुममध्ये आरोपी डॉक्टर गेला. त्यानंतर आरोपी डॉक्टरने रुग्णासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा रुग्णाने विरोध केला आणि जवळील अलार्म वाजवला. त्यानंतर रुमबाहेर असलेले कर्मचारी तातडीने आतमध्ये आले’, असे तक्रारीत नमूद केले आहे.
विशेष म्हणजे आरोपी डॉक्टरचा तो कामावरील पहिलाच दिवस होता. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे ३० एप्रिल रोजीच हा डॉक्टर रुग्णालयात रुजू झाला होता. मात्र आता या डॉक्टरला निलंबित करण्यात आलं आहे. तर आयपीसी कलम ३७७, २६९ आणि २७० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


