🕒 1 min read
पुणे : अभिनेते आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील होते. कोल्हेंनी सेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला.
२०१९ विधानभ निवडणुकांनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यातील सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर मतभेद आणि वाद असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. ज्या पक्षांच्या विरोधात नेत्यांना-कार्यकर्त्यांना लढावं लागलं, तेच पक्ष एकत्र आल्याने कटुता अद्यापही कायम असल्याचं वारंवार समोर आलं आहे. दरम्यान, असाच वाद खेडसह शिरूरमध्ये देखील सुरु असल्याचं पाहायला मिळतं.
आता पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन या दोघांमधील श्रेयवाद हा चांगलाच तापला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. यामुळे हा वाद चर्चेत आला असून काल अमोल कोल्हे यांनी आढळराव-पाटील यांना रोखठोक उत्तर दिलं आहे.
‘मुख्यमंत्री हे मुख्यमंत्रीपदावर आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे,’ असं विधान अमोल कोल्हे यांनी काल कार्यक्रमात बोलताना केलं होतं. त्याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका,’ असा सल्ला देत शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांची खरडपट्टी काढली आहे.
नेमकं काय म्हणाले कान्हेरे ?
अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आलीय बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धवसाहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो, त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे, अहो कोल्हे ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तूर खुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता. तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका, असा सल्ला शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी दिला आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले होते ?
शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असे वक्तव्य करताना, लॉकडाउनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र, महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळतंय. वयस्कर नेत्यांनं असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं, असं अमोल कोल्हे काल शिरूर येथे बायपास लोकार्पण कार्यक्रमानंतर बोलले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ऐश्वर्या बच्चन इन्स्टाग्रामवर केवळ ‘या’ एका व्यक्तीला करते फॉलो
- योगी महाराजांनी ‘तो’ कायदा लावलाच तर भाजपचे १६० आमदार बाद होतील; संजय राऊतांचा खोचक टोला
- शाब्बास ! ‘या’ कारणासाठी दहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास; उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- सावधान! श्रीलंकेचे ‘हे’ खेळाडू करु शकतात धवनसेनेचे दहन
- काळरात्र : चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररूप; घरांवर संरक्षक भिंत कोसळून १४ जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
