मुंबई : कोरोना व्हायरसने आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी खबरदारीचे आवाहन केलं जात आहे. ‘गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शक्य असेल तेवढा प्रवास टाळा, तसेच अफवा पसरवू नका,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील केलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काल परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. औषधीच्या साठ्याबाबत माहिती घेऊन औषधे कमी पडणार नाही व शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबतही संबंधितांना सूचना दिल्या.
दरम्यान, आज देशासह महराष्ट्रात कोरोनाने रौद्र रूप धारण केलं आहे. रोज एक-दोनने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या आता गुणाकाराच्या पटीत वाढताना दिसतीये. या सगळ्यांमुळे ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना घरी बसून रहावं लागतंय. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून राज्य शासनाने शिवभोजन थाळी पार्सल करून राज्यातल्या गोरगरीब जनतेला द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अचानक उद्भवलेल्या आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब कष्टकरी जनतेची रोजगार नसल्यामुळे उपासमार होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने हायजीन स्वरूपात शिवभोजन थाळीचं पॅकेट तयार करून जनतेपर्यंत व्हॅनद्वारे पोहचवावेत, अशी मागणी करणारं पत्र जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.


